मुंबई, – छगन भुजबळ यांच्यावरील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित होऊन करण्यात आली आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. मनी लॉंडरिंगच्या आरोपावरून सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी रात्री १० वाजता भुजबळ यांना अटक केली. ते उत्पन्नाच्या स्रोतांची माहिती देऊ न शकल्याने आणि चौकशीमध्ये सहकार्य करीत नसल्याने त्यांना अटक करण्यात आली, असे ईडीच्या अधिकार्यांनी रात्री सांगितले.
या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी भुजबळ यांची पाठराखण करत पक्ष संपूर्णपणे त्यांच्या पाठिशी असल्याचे नमूद केले. भुजबळांसाठी पक्ष कायदेशीर लढाईदेखील लढेल असेही त्यांनी सांगितले.
तसेच महाराष्ट्र सदनासंबंधीचे निर्णय फक्त भुजबळांनी घेतले नाहीत, तर ते निर्णय संपूर्ण मंत्रिमंडळाचे होते असं सांगत पवारांनी भुजबळांची पाठराखण केली.
दरम्यान भुजबळांच्या अटकेचे राज्यभरात पडसाद उमटले असून भुजबळ समर्थकांनी विविध ठिकाणी रास्तारोको करत निदर्शने केली. तसेच विधानभवनाच्या पाय-यांवरही आंदोलन करत सरकारविरोधात घोषणा दिल्या.