: मनी लॉंड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचा दोन दिवस मुक्काम आता ईडीच्या कोठडीत असणार आहे. छगन भुजबळ यांना जामीन नाकारण्यात आलाय. मुंबई सेशन्स कोर्टाने त्यांना २ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.
महाराष्ट्र सदन बांधकामात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी सोमवारी छगन भुजबळ यांना ११ तासांच्या मॅरेथान चौकशीनंतर अंमलबजावणी संचनालय अर्थान ईडीने अटक केली. छगन भुजबळांच्या अटकेमुळे राज्यात राजकीय भूकंप घडला. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामनाच राज्यभर पाहण्यास मिळाला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठिकठिकाणी निदर्शनं करत आहे.
तर दुसरीकडे ईडीने छगन भुजबळांना आज दुपारी मुंबई सेशन्स कोर्टात हजर केलं. त्याआधी त्यांची सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी झाली. तब्बल २ तासांच्या युक्तीवादानंतर भुजबळांना कोर्टाने २ दिवसांची ईडी कोठडी सुनावली. ईडीच्या वकिलांनी भुजबळांना तब्बल ४० प्रश्न विचारले. ८८७ कोटींची रक्कम आली कुठून आणि हा व्यवहार झाला कसा ? असा सवाल भुजबळांना विचारला असता यावर भुजबळांनी मौन बाळगले.
याआधीही समीर भुजबळांना अटक करण्यात आली. त्यानंतर पंकज भुजबळांची चौकशी झाली. पण, तिघांच्या चौकशीत एकवाक्यता आढळून आली नाही. तिघांनीही ८८७ कोटींचा व्यवहार झाला कसा याचा खुलासा करू शकले नाही. आता ईडीने या तिघांचीही आणि इतर आरोपींची समोरासमोर बसवून चौकशी करण्यासाठी कोर्टाकडे छगन भुजबळांची ३ दिवसांची कोठडी मागितली.परंतु, कोर्टाने २ दिवसांची कोठडी दिली आहे.
आपल्या विरोधात कोणतेही पुरावे नाही, आपण निर्दोष असल्याचा युक्तीवादही भुजबळांनी केला. पण, त्याचा काही फायदा झाला नाही. आता या दोन दिवसांत भुजबळांची चांगलीच झाडाझडती होणार असून राज्याचे उप-मुख्यमंत्री आता दोन दिवस कोठडीत मुक्कामी राहणार आहे.