मुंबई : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्सच्या मालकीच्या किंगफिशर हाऊस या प्रॉपर्टीच्या लिलावाला कोणीही बोली लावण्यासाठी पुढे आलं नाही. मोठा गाजावाजा करत स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील बँक समूहांनी एसबीआयकॅप्स ट्रस्टी मार्फत ऑनलाईन लिलाव पुकारला, मात्र मूळ किंमत जास्त असल्याचं कारण सांगत कोणीही बोलीदार बोली लावण्यासाठी पुढे आला नाही.एसबीआयकॅप्स ट्रस्टीने किंगफिशर हाऊससाठी १५० कोटी रूपये ही मूळ किंमत निश्चित केलीय. त्यामुळे बोलीदारांनी त्यापुढे बोली लावणं अपेक्षित होतं.मुंबईतील विले पार्ले परिसरात ही प्रॉपर्टी असून जवळपास १७ हजार चौरस स्क्वेअरफूट बांधकाम झालेलं आहे. ऑक्शनटायगर या वेबपोर्टलमार्फत हा ऑनलाईन लिलाव आयोजित करण्यात आला होता. सरफैसी ऍक्टमधील तरतुदीनुसार एखादा कर्ज चुकवण्यास अपात्र असेल तर त्याने तारण ठेवलेल्या अटल संपत्तीचा लिलाव करून कर्जाची वसुली करण्यात येते.मल्ल्यांच्या किंगफिशर एअरलाईन्सला स्टेट बँक आणि त्यांच्या नेतृत्वाखालील १७ बँकाच्या समूहांनी तब्बल नऊ हजार कोटी रूपयाचं कर्ज दिलंय. या कर्जाची परतफेड झालेली नाही. त्यामुळे स्टेट बँकेने गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ही प्रॉपर्टी ताब्यात जप्त केली.मात्र आज आयोजित करण्यात आलेल्या लिलावात कोणीही इच्छुक खरेदीदार पुढे न आल्याने किंगफिशर एअरलाईन्सला दिलेल्या कर्जाची वसुली कशी करायची हा मोठा प्रश्न निर्माण झालाय.