मुंबई : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणार्या लोकल ट्रेनखाली २४ तासात १७ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी आहेत. मागील २४ तासात मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गांवर झालेल्या अपघातात १७ प्रवाशांचा बळी गेला आहे. यातील सर्वाधिक अपघात मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकावर झाले असल्याचं समोर आलं आहे.कल्याण येथील अपघातात ३ पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाला. तर डोंबिवली, ठाणे, कुर्ला, सीएसटी, चर्चगेट, अंधेरी, बोरिवली, वसई रोड, पालघर, वडाळा, वांद्रे या स्थानकांवर झालेल्या अपघातात एकूण ११ जणांनी आपला जीव गमावला आहे. जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर फलाटांची उंची वाढवण्याचं काम सुरु आहे. मात्र गर्दी आणि लोकल पकडण्याची घाई हीच अपघातांमागील प्रमुख कारणे असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितलं. मृतांमध्ये ११ पुरुष आणि तीन महिला आहेत. तर ३ मृतदेहांची ओळख अद्यापही पटली नसल्याचं रेल्वे पोलिसांनी सांगितलं.लोकलमधून दररोज ७५ लाख नागरिक प्रवासी करतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे, रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिस जनजागृती मोहीम राबवतात. मात्र अपघातात प्रवाशांचा बळी जाण्याचं सत्र सुरुच आहे.