मुंबई : माहीम येथील मखदूम शाह बाबा दर्गा चॅरिटेबल ट्रस्टने माहीम दर्ग्यात ६०३व्या उरुसच्या निमित्ताने गुरुवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘भारत माता की जय’चा घोष करण्यात आला. सुरुवातीला बिगुलाच्या निनादात राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी मुस्लिम भाविकांनीही ‘भारत माता की जय’च्या घोषणेत आपला सूर मिसळला. कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ट्रस्टचे अध्यक्ष सोहेल खंडवानी, रिझवान र्मचट आदी उपस्थित होते.दर्ग्यात तिरंगा फडवण्याचा आपल्याला अभिमान असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. तिरंगा फडकवून तुम्ही एका सच्च्या मुसलमानाचे कर्तव्य पार पाडले, असंही मुख्यमंत्री म्हणाले.‘गळ्यावर सुरी ठेवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही, असं वक्तव्य करून ओवेसी यांनी खळबळ उडवून दिली होती. त्याचीच री ओढत त्यांच्या पक्षाचे आमदार वारिस पठाण यांनीही ‘भारत माता की जय’ म्हणण्यास नकार दिला होता. या प्रकरणी त्यांना विधिमंडळाचे अधिवेशन संपेपर्यत निलंबित करण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर माहीम दर्ग्यात आयोजित कार्यक्रमात ही घोषणा देण्यात आली, याला विशेष महत्व दिलं जात आहे.