नवी दिल्ली : मी आंबेडकर भक्त आहे. आरक्षण काढून घेण्याचं सोडाच; माझं सरकार आरक्षणाला धक्काही लागू देणार नाही, अशी ठाम भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. विज्ञान भवन आयोजित आंबेडकरांचं राष्ट्रीय मेमोरियल शिलान्यास कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (सोमवारी) आपलं मत व्यक्त केलं आहे. यावेळी बोलताना मोदी यांनी डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा गौरव करत भाजप सरकारबद्दल दलितांच्या मनात असलेल्या शंकाकुशंका दूर करण्याचा प्रयत्न केला. तसंच, भाजप सरकारविरोधात खोटा प्रचार करणार्या विरोधकांनाही मोदी यांनी खडे बोल सुनावले आहेत.दलितांना आरक्षणाचा अधिकार आहे. एका समाजाला दुर्बल करून देशाचा विकास साधताच येणार नाही. आम्ही सत्तेत आल्यापासून आमच्या बाबतीत चुकीचा संदेश पसरवला जात आहेत. देशात अनेक राज्यांमध्ये भाजपची सरकार आहे, पण कुठेही आरक्षण काढून घेण्याचं सोडाच; माझं सरकार आरक्षणाला धक्काही लागू दिला नाही, असं मोदी म्हणाले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही जणांकडून देशात आमच्याविरोधात खोटा प्रचार केलं जात आहे. विरोधकांच्या या राजकारणाला कोणीही बळी पडू नये, असं आवाहनही मोदींनी केलं आहे.