महाराष्ट्र शासन निर्णयानुसार दि. 16 ते 22 मार्च या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जलजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. जलजागृती सप्ताहाचा एक भाग म्हणून पाण्याचा अपव्यय टाळणे गरजेचे असून पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ना.श्री.गिरीश महाजन यांनी पत्राव्दारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जलतरण तलाव पावसाळा सुरु होईपर्यंत बंद ठेवण्यासंदर्भात उचित कार्यवाही करणेबाबत कळविले आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरण क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने उपलब्ध असलेल्या पाणी साठ्याचा पुढील कालावधीकरीता सुयोग्य पाणी वापर करण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करण्यासाठी विविध उपायोजना करण्यात येत असून महापालिका क्षेत्रातील जलतरण तलावांना पुरविण्यात येत असलेला पाणीपुरवठा बंद करणेबाबत महापालिका आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांनी निर्देश दिलेले होते. त्यांचे निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात बेलापूर विभागातील 8, नेरुळ विभागातील 19, वाशी विभागातील 10, तुर्भे विभागातील 12, कोपरखैरणे विभागातील 6 व ऐरोली विभागातील 7 अशा एकुण 62 जलतरण तलाव असलेल्या शैक्षणिक संस्था, क्रीडा संकुले, जिमखाना तसेच खाजगी गृहनिर्माण संस्था यांना 17 मार्च रोजी पत्र देऊन जलतरण तलावास पुरविण्यात येत असलेला पाणीपुरवठा बंद करणेबाबत कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार संबंधित संस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून सध्याची पाणीटंचाई लक्षात घेऊन जलतरण तलावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असल्याचे त्या संस्थांकडून सूचित करण्यात आलेले आहे.तरी नागरिकांनीही सध्याची पाणी टंचाई लक्षात घेता आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याचा कमीत कमी आवश्यकतेएवढाच वापर करावा व कोणत्याही स्वरुपात पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन महापौर श्री. सुधाकर सोनवणे आणि महापालिका आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Click here to Reply, Reply to all, or Forward
|