मुंबई : देवनार कचरा डेपोमध्ये झालेल्या आगीमुळे मुंबईची उपनगरं धुरकटून निघाली आहेत. आगीवर कालच नियंत्रण मिळवलं असलं तरी धगधगत असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून विषारी वायू हवेत पसरले आहेत.नवी मुंबई, उपनगरं अशा सर्वच भागात धूर ठळकपणे जाणवत आहे. अवघ्या मुंबईतील कचरा याठिकाणी इथे टाकला जातो. पण इथे आग लागल्याने त्यातून अनेक घातक वायू बाहेर पडत आहेत. इतकंच नाही तर या विषारी वायूमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनासह इतर त्रासांनाही तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे महापालिका, राज्य सरकारला या प्रश्नावर तातडीनं तोडगा काढण्याची गरज आहे.दरम्यान देवनार कचरा डेपोला आग लागण्याची दोन महिन्यातील दुसरी घटना आहे. कचऱ्यासोबत अनेक उपयोगात येणाऱ्या वस्तू, लोखंड देखील याठिकाणी येतात. त्यामुळेच कचरा माफियांकडूनच आगी लावली जात आहे, असा संशय महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी व्यक्त केला आहे.