मुंबईत मंत्रालयासमोर विष प्यालेल्या नांदेडच्या एका शेतकर्यांचा दुदैर्वी अंत झाला आहे. माधव कदम असं या शेतकर्याचं नाव आहे. मराठवाड्यात भीषण दुष्काळ आणि गारपीटीमुळे शेतकर्यांचं संपूर्ण आर्थिक गणित बिघडलं आहे. हातातोंडाशी आलेले पिक, वाढत्या कर्जामुळे शेतकरी आत्महत्यांच्या आकड्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.माधव कदम यांची नांदेड जिल्ह्यातील जानापुरी इथे 9 गुंठे कोरडवाहू जमीन आहे. मात्र दुष्काळामुळे अनेक जिल्ह्यातील पीके वाया गेली आहेत. राज्य सरकारने अशा शेतकर्यांसाठी दुष्काळ निधी जाहिर केला. मात्र माधव कदम यांना तो मिळाला नाही. दुष्काळी अनुदान वाटपात शासनाने अन्याय केल्याचा आरोप करीत बुधवारी मुंबईत मंत्रालयासमोर विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. कदम यांना पोलिसांनी तातडीने जीटी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र तिथेच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह नांदेडच्या दिशेने रवाना करण्यात आला आहे.या प्रकारामुळे सरकारवर राजकीय पक्षांतून टोकाची टीका होऊ लागली आहे. आजची घटना दुदैर्वी असून सरकारचे शेतकर्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचं स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले. उद्योगात तोटा आला तर सरकार उद्योगांना मदत करते. तशीच शेतीत तोटा आला तर शेतकर्यालाही मदत झाली पाहिजे, अशाही अशयाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.