मुंबई : सहकारी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजयुमोच्या शहराध्यक्षाला राजीनामा द्यावा लागला आहे. पीडित तरुणीनं भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केल्यानंतर ही कारवाई झाली. मला राजकीय षडयंत्रात गोवलं गेल्याचा दावा गणेश पांडे यांनी केला आहे.गणेश पांडे या भाजयुमोच्या मुंबई शहराध्यक्षाने मथुरेत झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान आपला विनयभंग केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. भाजयुमोच्या एका परिषदेनिमित्त देशभरातले कार्यकर्ते मथुरेतल्या एका हॉटेलात उतरले होते. तेव्हा ही घटना घडल्याचं पीडितेनं सांगितलं.4 मार्चच्या रात्री पांडेनं वारंवार फोन करुन, मेसेज करुन मला आपल्या रुमवर बोलावलं आणि तिथे गेल्यावर अश्लील वर्तन केलं, असा आरोप तिने केला आहे. इतकंच नव्हे तर ती तिथून निघालो असता त्याने हात पकडण्याचाही प्रयत्न केल्याचं तिने म्हटलं आहे.दरम्यान याप्रकरणी पीडितेनं कोणतीही पोलीस तक्रार दाखल केली नसून पक्षानं केलेली कारवाई पुरेशी असल्याचं म्हटलं आहे.