मुंबई, – सिनेमा, नाटक आणि छोट्या पडद्यावर एकापेक्षा एक सरस भुमिका करुन रसिकांच्या मनात आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते जनार्दन परब यांचं निधन झालं आहे. वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. मुंबईतील निवासस्थानी सकाळी आठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत निर्माण झालेली पोकळी भरुन काढणं कठीण असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात मुलगा दिग्दर्शक सर्वेश परब, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
जनार्दन परब यांनी तब्बल चार दशकाहून अधिक काळ गाजवला. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातदेखील छोट्या मोठ्या भुमिका केल्या. यातील काही भुमिका अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत. यामधील क्रांतीवीर चित्रपटातील त्यांची भुमिका अजूनही अनेकांच्या लक्षात आहे. जनार्दन परब यांनी मराठी चित्रपटांचं दिग्दर्शनदेखील केलं ज्यामध्ये माझा पती करोडपती, नवरी मिळे नवर्याला, गम्मत जम्मत, कुलस्वामिनी तुळजाभवानीसारख्या गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे.
त्यांच्या प्रमुख नाटकांमध्ये अवध्य, नटकीच्या लग्नाला, अजब न्याय वर्तुळाचा, हमिदाबाईची कोठी, रात्र थोडी सोंग फार, काका किशाचा, संगीत विद्याहरण, मुद्र राक्षस समावेश असून त्यांनी धुमशान, नशिबवान धाव खावचो, कबूतरखाना सारख्या मालवणी नाटकांमध्ये अभिनयासोबतच दिग्दर्शन देखील केले. जनार्दन यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ‘शंकर घाणेकर पुरस्कार’, २००८ सालचा ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ तसंच ‘कॉलेज साहित्य पुरस्कारानं’ सन्मानित करण्यात आले होते.