अहमदनगर, – शनी चौथ-यावर प्रवेश करण्यापासून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि कार्यकर्त्यांना रोखल्याने शनिशिंगणापूरमधील वातावरण चिघळले आहे. तृप्ती देसाई यांनी मंदिर परिसरातच ठिय्या आंदोलन केलं असून जोपर्यंत दर्शन मिळणार नाही तोपर्यंत जाणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. जर आम्हाला दर्शन मिळालं नाही तर आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात एफआयआर दाखल करु असंही तृप्ती देसाई यावेळी बोलल्या आहेत.
प्रार्थनास्थळांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने प्रवेश मिळणे हा महिलांचा मूलभूत हक्क आहे व या हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने सक्रियतेने पावले उचलावीत असा आदेश न्यायालयाने दिला होता. या पार्श्वभुमीवर भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई कार्यकर्त्यांसह शनी चौथ-यावर प्रवेश करण्यासाठी सकाळी रवाना झाल्या होत्या. मात्र शनिशिंगणापूरला पोहोचताच गावकरी आणि पोलिसांनी महिलांना रोखलं. न्यायालयाच्या आदेशानंतरही पोलिसांनी अटकाव केल्याने हा न्यायालयाचा अपमान असल्याचं तृप्ती देसाई बोलल्या आहेत.
शनिशिंगणापूरमध्ये ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात मंदिर परिसरात गर्दी केली होती. भुमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश करताच ग्रामस्थ आणि मंदिर समितीच्या लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थ आणि भुमात कार्यकर्त्या आपापसात भिडल्याने एकच गोंधळ उडाला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी आम्हाला सुरक्षा पुरवणं गरजेचं आहे मात्र ते आम्हाला अडवत का आहेत ? असा सवाल तृप्ती देसाई यांनी विचारला.