मुंबई : एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता एटीएम कार्डच्या पिन न दाबताच तुम्हाला पैसे मिळू शकतील. हे एप्रिल फुल नाही तर खरे आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता कोणीही स्वत:च्या आधार कार्डचा वापर करू शकेल. ट्राझॅक्शनच्या वेळी पिन क्रमाकांऐवजी बायोमेट्रीक डिटेल्स आणि आधार कार्डचा नंबर वापरून तुम्ही हे करू शकता.डीसीबी बॅंकेने देशात पहिल्यांदा अशा प्रकारे पैसे काढण्याची पध्दत आणली आहे. ‘आम्ही देशातील पहिली एटीएम सेवा सुरू केली आहे. ज्यात एटीएम कार्डच्या ऐवजी आधार कार्डचा वापर करता येवू शकतो,’ अशी माहिती बॅंकेचे महाव्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मुरली नटराजन यांनी दिली.एटीएमधारकाने एटीएमवर १२ अंकी आधार कार्ड पासवर्ड टाकावा किंवा एटीएम स्वाईप करून पिननंबर ऐवजी बॉयोमेट्रीक डिटेल्स टाकावे. तुम्ही दिलेली माहिती खरी आहे, हे तपासण्यासाठी एटीएम मशिनवर असलेल्या स्कॅनरवर बोटांचे ठसे स्कॅन होतील.ज्यांच्या नावावर अनेक बॅंक खाती आहेत, त्यांना अनेक एटीएमचे पिन क्रमांक लक्षात ठेवता येत नाही. अशा लोकांना ही सेवा अंत्यत फायदेशीर असल्याचे नटराजन यांनी सांगितले. या सुविधांसाठी खातेधारकांना त्यांचा आधार क्रमांक बॅंकेत नोंदवावा लागेल.सुरूवातीला डीसीबीच्या ग्राहकांसाठीच ही सेवा उपलब्ध केली जाणार आहे.