घणसोली डेपोचे उद्घाटन राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेचा विषय
नवी मुंबईः घणसोली येथे नव्याने उभारण्यात आलेल्या एनएमएमटी बस डेपोच्या उद्घाटनावरुन आता प्रशासन आणि परिवहन सदस्यांमध्ये वादंग होण्याची चिन्हे दिसत आहेत. सदर बस डेपोचे उद्घाटन महापालिकेत सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा नवी मुंबई महापालिकेचे रिमोट कंट्रोलर (मार्गदर्शक) असलेले माजी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्याचा घाट इथल्या सत्ताधार्यांनी घातला आहे. मात्र, महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या कार्यक्रमांना प्रोटोकॉलनुसार पालकमंत्री तथा महापौरांनाच बोलविण्याचे निर्देश परिवहन अधिकार्यांना दिल्याची चर्चा 4 मे रोजी महापालिका वर्तुळात सुरु राहिल्याने घणसोली
डेपोच्या उद्घाटनाचा विषय राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिष्ठेचा झाला आहे.
नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमद्वारा घणसोली नोडमध्ये उभारण्यात येत असलेल्या नवीन बस डेपोचे काम पूर्ण झाल्याने येत्या 16 मे रोजी या बस डेपोचे उद्घाटन करण्याचा घाट परिवहन उपक्रमाने घातला आहे.
परिवहन समितीचे सभापती साबू डॅनिअल यांनी या बसडेपोचे उद्घाटन माजी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्याचे घोषित केले होते. त्याअनुषंगाने परिवहन व्यवस्थापनाने उद्घाटनाची तयारी सुरु केली आहे. यासंदर्भात नवीन महापालिका आयुक्तांना महिती देण्यासाठी गेलेल्या परिवहन अधिकार्यांना नवीन आयुक्तांनी उद्घाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेत प्रोटोकॉलच्या मुद्यावरुन धारेवर धरल्याचे समजते. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे परिवहन प्रशासनाची परिस्थिती ना घर का ना घाट का अशी झाली आहे.
भविष्यात महापालिकेच्या विविध कामांच्या उद्घाटन प्रसंगी आयुक्त जर हीच भूमिका घेणार असतील तर लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही आमच्या अधिकाराची जाणीव आयुक्तांना करुन देऊ, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी घेतली आहे. त्यामुळे आगामी सर्वसाधारण सभेतच आयुक्त आणि लोकप्रतिनीधींमध्ये कलगीतुरा रंगणार असल्याचे बोलले जात आहे.
घणसोली, सेक्टर-15 मध्ये एनएमएमटी परिवहन उपक्रमाने नवीन बसडेपो उभारला आहे. या आगारामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातून बसेसचे नियोजन करणे सोपे होणार असून त्यामुळे तुर्भे आणि आसूडगाव आगारांवरील ताण कमी होणार आहे. सदर आगार लवकरच सुरु करण्यासाठी एनएमएमटी परिवहन उपक्रम प्रयत्न करत असून त्यात अनेक अडचणी येत होत्या, त्या आता दूर झाल्या असून सदर बसडेपोचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. या नवीन बस आगारासाठी 2012 मध्ये सिडकोने नवी मुंबई परिवहन उपक्रमाला भूखंड दिला. परंतु, सदर भूखंड विकासाविना तीन वर्षे पडून होता. सदर भूखंड विकसित करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र, त्यालाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुन्हा निविदा मागवण्यात आल्या. त्यानंतर सदर भूखंडावर सन 2015 मध्ये नवीन बस डेपो उभारण्याच्या कामास सुरुवात झाली.
वाशीनंतर ठाण्याकडे जाताना डेपो नसल्यामुळे एनएमएमटीच्या बसेसना रबाले किंवा ऐरोली बस स्थानकात जावे लागत होते. घणसोलीतून कळंबोली, करावे, वाशी रेल्वे स्थानक, उरण आणि मुंबईत ताडदेवसाठी बसेस सुटतात. तसेच या ठिकाणी बसचालक आणि वाहकांसाठी केबिन तयार करण्यात आली होती. परंतु, तिथे स्वच्छतागृहाची सोय नाही. त्यामुळे या ठिकाणी नवीन आगाराची गरज होती. त्यानुसार एनएमएमटी उपक्रमाने घणसोली, सेक्टर-15 मध्ये बस आगार उभारण्याचे काम हाती घेतले. 29,716.63 चौरस मीटर भूखंडावर सदर डेपो उभाण्यात येत आहे. त्यामुळे येत्या 16 मे रोजी या नवीन बस डेपोच्या उद्घाटनाचा घाट घालण्यात आला आहे.