नवी मुंबईः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नवी मुंबईतील मोडकळीस आलेल्या पोलीस वसाहतींची पोलीस गृहनिर्माण विभागामार्फत दुरुस्ती तसेच त्यांना वाढीव एफएसआय देऊन पुनर्विकास करण्यासाठी बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
पोलीस वसाहतींची झालेली दुरावस्था आणि वाढीव एफएसआयबाबत निर्णय घेण्यासाठी गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी त्यांच्या मंत्रालयातील दालनात बैठकीचे आयोजन केले होते. नवी मुंबईत पोलिसांची मोडकळीस आलेली घरे शासनामार्फत बांधून देण्याबाबत 2004 सालापासून विधी मंडळात सभागृहामध्ये लक्षवेधी मांडली जात होती. मात्र, त्याकडे राज्य शासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले होते. पण, सदर गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी 4 मे रोजी गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या दालनात एक बैठक घेण्यात आली होती. सदर बैठकीस आमदार मंदाताई म्हात्रे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, गृहनिर्माण विभागाचे अपर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील मुख्यालय उपआयुक्त प्रशांत खैरे, महापालिकेतील नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक हजारे, आदिंसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सिडकोला पोलिसांनी द्यावयाचे 2.80 कोटी शासनाने माफ करावे. पोलिसांच्या घरांसाठी किमान 2.5 एफएसआय द्यावा. नवीन घरांना 2.5 एफएसआय देऊन दिवाळीचा मुहूर्त काढावा, अशी मागणी यावेळी आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली.