नवी मुंबईः शाळा कॉलेजेसचे निकाल लागून आता विद्यार्थी वर्गाला मे महिन्याची सुट्टी लागली आहे. काही शाळांमध्ये नवीन विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियाही पार पडली आहे. मात्र, तरीही नवी मुंबई महापालिका शिक्षण मंडळाने नवी मुंबई शहरातील बेकायदा शाळांची यादी अद्याप जाहिर केलेली नाही. त्यामुळे आपल्या पाल्यासाठी प्रवेश घेतलेल्या शाळा अधिकृत की अनधिकृत या विवंचनेत पालकवर्ग सापडला आहे.
दिवाळीची सुट्टी सुरु होताच नवी मुंबईतील काही शाळांमध्ये नर्सरी-केजी वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सुरु होऊन ती जानेवारीच्या पहिल्या-दुसर्या आठवड्यापर्यंत असते.यादरम्यान पालकाची मुलांच्या प्रवेशासाठी लगबग सुरु होते. त्याचवेळी शिक्षण मंडळाने शहरातील खासगी, मान्यताप्राप्त आणि बेकायदा शाळांची यादी जाहिर करणे क्रमप्राप्त आहे. जेणेकरुन मुलांसाठी शाळेत प्रवेश घेणे पालकांना सोईस्कर ठरु शकते. नवी मुंबईत अनेक संस्था जागा आणि मान्यता नसतानाही शाळा सुरु करतात. शाळेच्या मान्यतेची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगून अनेक संस्था चालक पालकांची दिशाभूल करतात. त्यामुळे एखाद्या शाळेला मान्यता मिळाली नाही तर विद्यार्थ्यांचे नुकसान होते.
त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शिक्षण मंडळ दरवर्षी शहरातील अशा अनधिकृत शाळांची यादी जाहिर करते. पण, शिक्षण मंडळाने झोपेचे सोंग घेतल्याचे दिसत आहे. यंदा मे महिना उजाडला तरी शिक्षण मंडळाने अशा शाळांची माहिती जाहिर केलेली नाही. त्यामुळे आता ज्यांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश घेतले आहेत त्यातील काही शाळा मान्यताप्राप्त नसतील तर त्याला शिक्षण मंडळाचा ढिसाळ कारभार कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाने जून महिन्यात शाळा सुरु झाल्यानंतर अनधिकृत शाळांची माहिती जाहिर करण्याऐवजी ती एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अथवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु करण्याची मागणी होत आहे.