महापालिका निवडणूक योजनेचा अभाव
शिवसेना-भाजपाची रणनीती तयार
मुंबई : अवघ्या काही महिन्यावर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका आल्या आहेत. परंतु गटबाजीच्या विळख्यात अडकलेल्या मुंबई कॉंग्रेसने अद्यापि महापालिका निवडणूका जिंकण्यासाठी कोणतीही निवडणूक योजना अथवा रणनीती आखली नसल्याचे पहावयास मिळते. गटबाजीमध्ये मुंबई कॉंग्रेस विखुरली गेल्याने निवडणूक रणनीती बनण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याची नाराजी कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून उघडपणे व्यक्त केली जावू लागली आहे. सध्या संजय निरूपम, गुरूदास कामत, प्रिया दत्त, मिलिंद देवरा, कृप्पाशंकर सिंह आणि नसीम खान अशा वेगवेगळ्या गटांमध्ये मुंबई कॉंग्रेस विभागली गेली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही समिती निवडली गेल्यास त्या समितीमध्ये सर्व गटाच्या लोकांना सामील करावे लागेल. त्यामुळे मनपा निवडणूकीत तिकिटवाटप करताना आपल्या लोकांना तिकिट देण्यास मर्यादा पडतील अशी भीती मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांना वाटत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याउलट शिवसेना-भाजपाने निवडणूकीकरता कंबर कसली असून जोरदार तयारीही सुरू केली आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची मोर्चेबांधणी व सत्ता कायम राखण्यासाठी शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरेंची वाढती सक्रियता उघडपणे पहावयास मिळत आहे.
महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या छावणीत कमालीची शांतता पहावयास मिळत आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नैराश्येचे वातावरण पसरले आहे. मुंबई कॉंग्रेसची सध्याची वाटचाल पाहता संजय निरूपम हे शिवसेना-भाजपाशी लढण्याऐवजी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षातील अन्य गटांना पराभूत करण्यासाठीच काम करत असल्याचा आरोप आता कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. निरूपम यांना कॉंग्रेसची महानगरपालिकेत सत्ता आणावयाची असल्यास त्यांना गुरूदास कामत, प्रिया दत्त, मिलिंद देवरा, कृप्पाशंकरसिंह, नसीम खान यांना सोबत घेवूनच एकित्रत निवडणूक व्यूहरचना बनवावी लागणार आहे. मुंबई अध्यक्ष या नात्याने निरूपम यांनीच कॉंग्रेसच्या सर्व गटांना एकत्रित आणण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. परंतु निरूपम असे करत नसल्याचा सूर कार्यकर्त्यांकडून आळविला जात आहे. मुंबई महापालिकेत सध्या भ्रष्टाचाराची नवनवीन प्रकरणे समोर येत आहे. निवडणूक प्रचारात भ्रष्टाचाराचा मुद्दा बनविल्यास कॉंग्रेसला लाभ होण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका आता जवळ येवू लागल्या आहेत. परंतु निवडणूकांचे गांभीर्य पाहता कॉंग्रेसच्या कार्यपध्दतीमध्ये कोणताही बदल पहावयास मिळत नाही. पक्ष कार्यालयामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांची संख्या कमी पहावयास मिळत आहे. गटबाजीमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांना अडगळीत पडावे लागत आहे. याशिवाय कॉंग्रेस पक्ष कार्यालयात आठवड्यातून दोन ते तीन दिवस सुट्टीसारखेच वातावरण पहावयास मिळते.