नवी मुंबई: नवी मुंबईत गांवठाणामध्ये प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी वाढत्या कुटुंबाची गरज म्हणून नैसर्गिक गरजेपोटीची घरे अधिकृत करण्यासाठी गेली 20 वर्षे शासन दरबारी निर्णय झाला नव्हता. परंतु, बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सततचा पाठपुरावा आणि केलेल्या अथक प्रयत्नांमुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे अधिकृत करण्याची घोषणा विधानसभेत केली. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल आमदार मंदाताई म्हात्रे यांचा हजारो प्रकल्पग्रस्तांच्या वतीने खारी-कळवा प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना आणि सिडकोएमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समिती या संस्थांच्या वतीने 9 मे रोजी वाशीत जाहिर नागरी सत्कार करण्यात आला.
अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालेल्या सदर नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी नवी मुंबई महापालिकेचे स्थायी समिती सभापती शिवराम पाटील, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, विजय घाटे, माजी विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे,खारी-कळवा प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनाचे अध्यक्ष मोरेश्वर पाटील, जयश्री पाटील, कमलताई पाटील, सिडकोएमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील, कार्याध्यक्ष डॉ. राजेश पाटील, वसंत म्हात्रे, नगरसेवक एम. के. मढवी, किशोर पाटकर, रामचंद्र घरत, रमण भोईर, बाळाराम पाटील, मारुती भोईर, माजी नगरसेविका विजया घरत, अनिता पाटील, सलीमभाई, नामदेव डाऊरकर, रामभाऊ पाटील, शिवसेना उपशहर प्रमुख रोहिदास पाटील, आदिंसह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त बांधव उपस्थित होते.
दरम्यान, नवी मुंबईत सिडकोने लीजवर दिलेली घरे स्वत:च्या मालकीची कशी होतील यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी दिली.