नवी मुंबई : स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणूकीत अवघ्या एका मताने पराभूत झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या छावणीत कमालीचा ‘सन्नाटा’ पसरला आहे. मित्र पक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्षाच्या स्थायी समिती सदस्याने शिवसेनेला मतदान केल्याने स्थायी समिती सभापतीपदी शिवसेना विराजमान झाली आहे. पालिकेच्या अर्थकारणाच्या तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडे गेल्याने पालिका मुख्यालयातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांच्या चेहऱ्यावर सुतकी अवकळा पसरल्याचे पहावयास मिळत आहे. महापालिका स्थापनेपासून प्रथमच नाईकांच्या रणनीतीला शह बसल्याचे पालिका मुख्यालयात बोलले जात आहे.
महापालिका स्थापनेपासून १९९५ ते आजतागायत महापालिका कारभारावर गणेश नाईकांचे एकहाती वर्चस्व राहीले आहे. अपर्णा गवते यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संख्याबळात एकने घट झाली. तथापि १५ सदस्यीय स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे संख्याबळ आठ तर शिवसेना-भाजपाचे संख्याबळ ७ होते. तथापि कॉंग्रेसने राष्ट्रवादीशी मैत्रीधर्म न निभावता शिवसेनेला साथ दिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला पराभूत व्हावे लागले. कॉंग्रेसच्या नगरसेविका मिरा पाटील या कट्टर संतोष शेट्टी समर्थक असून महापालिकेच्या पहिल्या ते चौथ्या सभागृहात चार वेळा सलग संतोष शेट्टी नगरसेवक राहीले आहेत. संतोष शेट्टी यांनीच मिरा पाटील यांना निवडून आणले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक जयवंत सुतार व कॉंग्रेसचे संतोष
शेट्टी यांच्यात फारसे राजकीय सख्य नसल्याने मिरा पाटील या जयवंत सुतारांना मतदान करणार नसल्याच्या पैजाही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही नगरसेवकांमध्ये लागल्या होत्या. संतोष शेट्टी यांचे शिवसेना नगरसेवकांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंधही लपून राहीलेले नाहीत. कॉंग्रेसला उपमहापौरपद व आरोग्य समिती सभापतीपद दिले असल्याने कॉंग्रेस विरोधात जाणार नसल्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा समज होता.
राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेवर असली तरी पालिका सभागृहात अन्य नगरसेवकांच्या तुलनेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक नेतृत्व नेरूळ पूर्वेच्या दोन नगरसेवकांनाच अवास्तव महत्व देत असल्याची नाराजी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांकडून आता उघडपणे व्यक्त होवू लागली आहे. त्या दोन नगरसेवकांपैकी एक नगरसेवक पालिका निवडणूकीअगोदर पूर्णपणे भाजपामय होण्याच्या तयारीत होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाकडून आपली उपेक्षा होत असून निष्ठा नसणाऱ्या नगरसेवकांचा उदोउदो होत असल्याची खंतही निष्ठावंत नगरसेवकांकडून व्यक्त केली जात आहे. महापौर अपक्ष, उपमहापौर कॉंग्रेसचा, स्थायी समिती सभापतीदेखील शिवसेनेचा मग सभागृहात आपले काय, असा प्रश्न आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांकडून विचारला जात आहे. दीड वर्षानी होणाऱ्या महापौर निवडणूकीतही महापौर-उपमहापौरही राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नसणारच, असा दावा आता शिवसेना- भाजपाच्या नगरसेवकांकडून केला जावू लागला आहे.