नवी मुंबई : वाशीतील एमजीएम रूग्णालयात जीवन आणि मृत्यूशी लढाई लढणारे स्वराज होम्सचे मालक राज कंधारी यांचा मंगळवारी सांयकाळी मृत्यू झाला. सोमवार दुपारपासून ते व्हेन्टिलेटरवर होते. आर्थिक चणचण व व्यवसायाचा ताण यातून त्रस्त झालेल्या राज कंधारी यांनी सानपाडा येथील आपल्या निवासस्थानी स्वत:च्या रिव्हाल्व्हरमधून स्वत:वर गोळी झाडली होती. मंगळवारी सांयकाळी ७ वाजता एमजीएम रूग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ठाणे, कल्याणपाठोपाठ नवी मुंबईतील बिल्डरनेही आत्महत्या केल्याने आत्महत्या केलेल्या बिल्डरांची संख्या तीनवर गेली आहे. बुधवारी राज कंधारीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कंधारी यांचे निकटवर्तीय स्नेही डेंजिल मास्केरन्स यांनी कंधारी हे गेल्या ८ दिवसांपासून आर्थिक चणचण व व्यवसायाचा ताण यामुळे त्रस्त झाले असल्याची माहिती सानपाडा पोलिसांना दिली. कंधारींची पत्नी व बहीण याबाबत काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. पोलीस कंधारींचे आर्थिक देण्या-घेण्याचे व्यवहार व त्यांच्या गृहनिर्माण प्रकल्पांबाबत चौकशी करत असून त्यातून आत्महत्येमागील खरे कारण समजण्यास मदत होणार असल्याची माहिती सानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक आनंदा होडगे यांनी सांगितले.