मुंबई : गुन्हे अन्वेषण विभागाने बोगस नोटाप्रकरणी तीन जणांना अटक केली असून त्यांच्याजवळून ३ लाख २ हजार ५०० रूपयांच्या बोगस नोटा जप्त केल्या आहेत. अटक केलेल्या आरोपींनी अमरावती, नाशिक, पुणे व नागपुरसह महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्ये बोगस नोटा चलनामध्ये वापरल्या असल्याची माहिती पोलिस चौकशीत दिली. चौकशीमध्ये बोगस नोटांच्या सूत्रधारांविषयी पोलिसांना माहिती मिळाली असून पोलिसांचे एक पथक लवकरच या सूत्रधारांच्या अटकेकरता बंगालला जाणार आहे.
गुन्हे अन्वेषण विभाग युनिट ३ चे प्रभारी पोलिस निरीक्षक सुनील माने, पोलिस निरीक्षक धनजंय फडतरे, सहायक पोलीस निरीक्षक अरूण धनवडे, उपनिरीक्षक दत्तात्रय कोळंबकर यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी दक्षिण मुंबईतील सेनापती बापट मार्गावरील होली क्रॉस हायस्कूलजवळ तीन जणांना अटक केल्याची माहिती मुंबई पोलिसांचे प्रवक्ते धनजंय कुलकर्णी यांनी दिली. पोलिसांनी या तीनजणांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ ५०० रूपयांच्या २०२ आणि १००० रूपयांच्या २०० बोगस नोटा सापडल्या. आरोपींजवळ सापडलेल्या बोगस नोटां इतक्या चांगल्या होत्या की सहजासहजी त्या खऱ्या की बोगस हे समजणेही अवघड होते.
पश्चिम बंगाल येथील मालदा येथे राहणारे बारेक हुसैन शेख (३६), सैफुद्दीन बदलु मोमीन (३३), मुसलोदिन तालिम मोमिन (४४) अशी अटक केलेल्या तीन आरोपींची नावे असून ते काही दिवसापूर्वीच बोगस नोटा घेवून मुंबईत आले होते आणि बोगस नोटा वटविण्याचे काम करत होते. पोलिस चौकशीत सैफुद्दीन मोमीनने सांगितले की सहा महिन्यापूर्वी तो अमरावती येथे असताना ५० हजार रूपयांच्या बोगस नोटा वटविण्यात तो यशस्वी झाला. पश्चिम बंगाल येथील मालदा येथून मुंबईसह महाराष्ट्रातील अन्य भागात मोठ्या प्रमाणावर बोगस नोटांचा चलनात वापरण्याकरता पुरवठा होत आहे. फक्त ५० हजार रूपयांमध्ये १ लाख रूपयांच्या बोगस नोटा मिळतात. झटपट पैसे कमिवण्याकरता बंगालचे युवक या बोगस नोटा चलनात आणण्याकरता महाराष्ट्रातील विविध शहरामध्ये फिरत असतात. या बोगस नोटा बांगलादेशाची सीमा ओलांडून पश्चिम बंगाल येथे आणल्या जातात. येथून देशभरात बोगस नोटा चलनात आणण्याकरता पाठविल्या जातात. बांगलादेशातून आणल्या जाणाऱ्या बोगस नोटांची छपाई व कागदाचा दर्जा चांगला असल्याने लवकर बोगस नोटांचा परिचय होत नाही. पाकिस्तानातील टाकसाळीत भारतीय चलनाच्या बोगस नोटा छापून त्या बांगलादेशातून भारतात पाठविल्या जात असल्याचा पोलिसांना संशय आहे.