सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून अनधिकृत नळजोडण्यांवर महापालिकेच्या विभाग कार्यालयातंर्गत असणार्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी-अधिकार्यांकडून कारवाई बुधवारीही कायम राहीली. बुधवारी सकाळपासून नेरूळ सेक्टर सहामधील महापालिकेच्या समाजमंदीरानजीकच्या इमारतींमधील अनधिकृत नळजोडण्यांवर पाणीपुरवठा विभागाकडून कारवाई सुरू झालेली आहे. तथापि अनधिकृत नळजोडण्या खंडीत केल्यावर त्या इमारतींमधील लोकांची पाण्यासाठी धावाधाव होत नाही. मनपा प्रशासनाने आयुक्तांना कागदोपत्री कारवाई दाखविण्यासाठी अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करायची आणि मनपा कर्मचारी गेल्यावर त्या इमारतींमधील रहीवाशांनी प्लंबर आणून पुन्हा अनधिकृत नळजोडणी पूर्ववत जोडून घ्यायची. हाच प्रकार आजही सुरू असल्याने पाणीपुरवठा विभागाकडून सुरू असलेली अनधिकृत नळजोडण्यांवरील कारवाई खरी का खोटी असा प्रश्न नवी मुंबईकरांकडून उपस्थित केला जात आहे. अनधिकृत नळजोडण्यांच्या माध्यमातून पाणीचोरी करणार्यांवर थेट फौजदारी गुन्हेच दाखल करण्याची मागणी नवी मुंबईकरांकडून केली जावू लागली आहे.
एरव्ही अनधिकृत नळजोडण्या आणि अनधिकृत जलवाहिन्यांच्या माध्यमातून पाणी चोरी होत असल्याचे पाणीपुरवठा विभागालाही माहिती आहे. राजकीय दबाव आणि दरमहिन्यात नियमित असणारे आर्थिक लागेबांधे या पार्श्वभूमीवर अनधिकृत नळजोडण्या आणि अनधिकृत जलवाहिन्या यावर पालिका प्रशासनाकडून कारवाईस टाळाटाळ केली जात असे. शिरवणे गावामध्ये सोमवारी 21, मंगळवारी सारसोळे गावात 24 अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्यात आली. बुधवारी सकाळपासून नेरूळ सेक्टर सहामधील समाजमंदीरालगतच्या इमारतींमधील अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई सुरू करण्यात आली. तथापि ही कारवाई नवीन आलेल्या पालिका आयुक्तांच्या समाधानाकरता असल्याची चर्चा नवी मुंबईकरांमध्ये सुरू आहे.
अनधिकृत नळजोडण्या खंडीत झाल्यावरही संबंधित इमारतींमधील रहीवाशांच्या चेहर्यावर कोणत्याही प्रकारचा तणाव दिसत नाही. कारण नळजोडण्या खंडीत झाल्यावर प्लंबर आणून नळजोडण्या पूर्ववत केल्या जातात. पाणीचोरांचे व पाणीपुरवठा विभागाचे लागेबांधे असल्याने अनधिकृत नळजोडण्यांवरील कारवाईचा नेहमीच फज्जा उडताना पहावयास मिळतो. पालिका आयुक्तपदी मुंढेसारखा खमक्या व कार्यक्षम अधिकारी आल्यामुळे केवळ दाखविण्यापुरती अनधिकृत नळजोडण्यांवर पाणीपुरवठा विभागाकडून कारवाई सुरू झालेली आहे.
अनधिकृत बॅनर, होर्डीग लावणार्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल होतात, मग वर्षानुवर्षे अनधिकृत नळजोडण्यांच्या माध्यमातून पाणी चोरी करणार्यांवर पालिका प्रशासन फौजदारी गुन्हे का दाखल करत नाही असा संतप्त प्रश्न नवी मुंबईकरांकडून विचारला जावू लागला आहे. अनधिकृत नळजोडण्यांवर झालेल्या कारवाईचा अहवाल पालिका आयुक्तांनी मागवून घ्यावा आणि नंतर पालिका आयुक्तांनी स्वत: जावून त्या ठिकाणची पाहणी करावी. या कारवाईतील फोलपणा स्वत: आयुक्तांना पहावयास मिळेल. अनधिकृत नळजोडण्या लगेचच प्लंबरकडून पूर्ववत होतात, पण खोदकाम केलेल्या रस्त्याचे काय, त्या रस्त्याची डागडूजीपण पाणीपुरवठा विभागाच्याच कर्मचारी व अधिकार्यांच्या पगारातून करून घेण्याची मागणी नवी मुंबईकरांकडून करण्यात येत आहे.