नवी मुंबई : महापालिकेच्या नेरूळ विभाग कार्यालयाकडून नेरूळ सेक्टर 8 मधील अंबिका शॉपिंग कॉम्पलेक्समधील चायनीजचालकांच्या अतिक्रमणावर बुधवारी कारवाई करण्यात आली. कारवाईच्या नावाखाली कारवाईची केवळ नौटंकीच पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून करण्यात आल्याचे काही मिनिटातच स्पष्ट झाले. पालिका आयुक्त मुंढे यांच्या डोळ्यात धुळफेक करण्याकरताच नेरूळ विभाग कार्यालयाने ही कारवाई केली असल्याचे पालिका वर्तुळात बोलले जात आहे.
चायनीजवाल्यांनी मुळ जागेपेक्षा सभोवतालच्या जागेवर पत्रे टाकून अतिक्रमण केले आहे. इतकेच नाही तर सांयकाळनंतर सभोवतालच्या परिसरात खुर्च्या व टेबल टाकून अतिक्रमण केले जाते. या चायनीजचालकांच्या अतिक्रमणाबाबत स्थानिक रहीवाशांमध्ये कमालीचा संताप असतानाही चायनीजचालकांकडून मिळणार्या चिरीमिरीमुळेच त्यांना पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून राजाश्रय मिळत असल्याचा आरोप स्थानिक रहीवाशांकडून केला जात आहे.
बुधवारी चायनीजवाल्यांवर कारवाई करण्यात आली. रॉयल चायनीझ, टेम्पटेशनवर नाममात्र कारवाई करण्यात आली. या कारवाईत रवी चायनीजवाल्याची फारशी हानी होणार नाही याची महापालिकेच्या विभाग कार्यालयाकडून विशेष दक्षता घेण्यात आली. चायनीजवाल्यांकडून मिळणार्या प्रेमामुळेच पालिका आयुक्त मुंढे यांच्या डोळ्यात धुळफेक करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
चायनीजवाल्यांच्या मुळ टपर्यांची जागा छोटेखानी असून या चायनीज व्यावसायिकांनी सभोवताली पत्रे टाकून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अतिक्रमण केले आहे.या चायनीजचालकांचे राजकीय लागेबांधे असल्यामुळे व दरमहिन्याला चिरीमिरी मिळत असल्यामुळेच पालिका प्रशासन कारवाईस टाळाटाळ करत असल्याचा आरोप स्थानिक रहीवाशांकडून करण्यात येत आहे. पालिका आयुक्त मुंढे यांनी सांयकाळच्या वेळी या चायनीजच्या अतिक्रमणाची पाहणी केल्यास त्यांना पालिकेच्या अतिक्रमण कारवाईची नौटंकी लगेचच निदर्शनास येईल. आयुक्तांनी चायनीजच्या अतिक्रमणावर कारवाई करून आरोग्य सुविधेला कायमस्वरूपी दिलासा देण्याची मागणी स्थानिक रहीवाशांकडून केली जात आहे.