अनधिकृत नळजोडणी तोडणार्यांना पोलीस संरक्षणाची गरज
नवी मुंबई : अनधिकृत नळजोडण्यांच्याविरोधात महापालिका प्रशासनाने सोमवारपासून कारवाई सुरू केली असली तरी आता अनधिकृत नळजोडणी करणार्यांच्याच जिविताला धोका निर्मांण झाल्याचे निदर्शनास आले आहे. बुधवारी नेरूळगावामध्ये अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्यास गेलेल्या पालिका कर्मचार्यांना शिविगाळ करण्यात आली. तसेच यापुढे परत आल्यास तंगड्या तोडू अशी भाषा वापरण्यात आल्याने महापालिका कर्मचारी भयभीत झाले आहेत. अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करताना महापालिका प्रशासनाने यापुढे पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी या कर्मचार्यांकडून करण्यात येवू लागली आहे.
नवी मुंबईमध्ये शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात अनधिकृत नळजोडण्यांचे प्रमाण अधिक आहे.वाणिज्य वापरकर्त्यांकडूनही अनधिकृत नळजोडण्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची चोरी होत आहे. हॉटेल व्यवसायातीलच लोक मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळजोडण्या जोडल्या जात आहे.
सोमवारी शिरवणे गावात, मंगळवारी सारसोळे गावात, बुधवारी सेक्टर नेरूळ सहा व नेरूळ गावातील अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्यात आली. नेरूळ गावामध्ये अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्यास महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी गेले असता त्यांना विचित्र अनुभव आला. नेरूळ गावातील काही ग्रामस्थांनी त्यांना शिविगाळ केली व मारहाण करण्याकरता अंगावर धावून आले. यामुळे भयभीत झालेल्या पाणीपुरवठा कर्मचार्यांनी तेथून काढता पाय घेतला.
गावागावामध्ये घरपट्टी तसेच गावठाणातील इमारती मोठ्या संख्येने आहेत. या इमारतींमध्ये सर्रासपणे अनधिकृत नळजोडण्या पहावयास मिळतात. त्यामुळे शहरी भागाच्या तुलनेत गावठाणात पाणीचोरीचे प्रमाण अधिक आहे. गावठाणामध्ये अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करावयाची म्हटल्यास पाणी खात्याच्या कर्मचार्यांच्या अंगावर भीतीने काटे उभे राहतात. गावातील महिला व पुरूष अंगावर धावून येतात. शिविगाळ करतात. त्यामुळे अनेकदा जिवितास धोका निर्माण होत असल्याची भीती पालिका कर्मचार्यांकडून व्यक्त केली जात आहे. पाणीटंचाईच्या काळात अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करून त्या बंद केल्यास नवी मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. या अनधिकृत नळजोडण्यांच्या माध्यमातू पाणीचोरी करणार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी नवी मुंबईकरांकडून करण्यात येत आहे.