पालिका प्रशासनाला आली उशिराने जाग
नवी मुंबई : पाणीटंचाईचा नवी मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत असतानाच अनधिकृत जलवाहिन्यांमुळे होत असलेल्या पाणीचोरीकडे महापालिका प्रशासनाचे विभाग कार्यालय व पाणीपुरवठा विभाग कानाडोळा करत आहे. नवीन महापालिका आयुक्त मुंढे यांच्या कामकाजाचा दणका प्रशासकीय अधिकार्यांना बसू लागल्यावर पाणीपुरवठा विभागाला जाग आली असून अनधिकृत जलवाहिन्या व नळजोडण्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे.
नवी मुंबईत अनधिकृत जलवाहिन्या व अनधिकृत नळजोडण्या ही समस्या भयावह स्वरूप धारण करत असतानाच हा भस्मासूर महापालिका विभाग अधिकारी व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांच्यामुळेच आजवर पोसला गेला आहे. शहरी भागाच्या तुलनेत गावठाणामध्ये अनधिकृत जलवाहिन्या व अनधिकृत नळजोडण्यांचे प्रमाण अधिक आहे. विशेष म्हणजे घरपट्टीच्या इमारती व गावठाणातील इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळजोडण्या आहेत. महापालिका प्रशासनाचा पाणीपुरवठा विभाग आणि विभाग अधिकारी कार्यालय या दोन्ही विभागांना अनधिकृत नळजोडण्या आणि अनधिकृत जलवाहिन्यांची खडा न् खडा माहिती असतानाही आजवर मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या पाणीचोरीकडे कानाडोळा करण्यात आला आहे. अनधिकृत नळजोडण्या व अनधिकृत जलवाहिन्यांवर कधी राजकीय हितसंबंधांमुळे तर कधी दर महिन्याला होणार्या अर्थयुक्त लाभामुळे पालिका प्रशासनाचे विभाग कार्यालय व पाणीपुरवठा विभाग पाणीचोरीला आजवर राजाश्रय देत आला आहे.
गावठाणातील इमारती व घरपट्टीच्या इमारतींमध्ये पाणीचोरी मुबलक होत असल्याने साडेबारा टक्केच्या भुखंडावरील इमारती, सिडकोच्या इमारतींना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हॉटेलांनाही अनधिकृत नळजोडण्यांतून खुलेआमपणे चोरीचे पाणी मुबलक प्रमाणांमध्ये उपलब्ध होत आहे. नवीन आयुक्त मुंढे यांच्या प्रशासकीय दणक्यामुळे गेल्या दोन दिवसापासून पाणीपुरवठा विभाग कामाला लागल्याचे व अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई सुरू झाल्याचे पहावयास मिळत आहे. सोमवारी शिरवणे विभागात 21 ठिकाणी अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्यात आली. मंगळवारी सकाळी सारसोळे गावातील 10 ते 12 ठिकाणच्या अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्यात आली असून दुपारी 2 नंतर पुन्हा सारसोळेतील अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्यांनी दिली.
सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळजोडण्या असल्याने व या माध्यमातून होणार्या पाणीचोरीची पाणीपुरवठा विभागाल इंत्यभूत माहिती असल्याने अनधिकृत नळजोडणीच्या माध्यमातून पाणी वापरणार्यांचे धाबे दणाणले आहेत. तथापि ही कारवाई किती खंबीरपणे होत आहे यावर महापालिका आयुक्त मुंढे यांची कार्यक्षमता स्पष्ट होणार आहे. आजवर नावाला एकाद्या अनधिकृत नळजोडणीवर कारवाई होते आणि कारवाई झाल्यावर काही मिनिटात संबंधित बिल्डींग मालक प्लंबरला आणून नळजोडण्या पूर्ववत करतात, असा आजवरचा अनुभव आहे. नवीन पालिका आयुक्त मुंढे यांनी खरोखरीच अनधिकृत नळजोडण्यांचा शोध घेतल्यास नवी मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नसल्याचा सूर सर्वसामान्यांकडून आळविला जात आहे. नवीन पालिका आयुक्त मुंढे हे खरोखरीच अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई गंभीरपणे करण्यास पालिका प्रशासनाला भाग पाडणार का ही कारवाई औटघटकेची नौटंकी ठरणार, याचे उत्तर नजीकच्या काळात पहावयास मिळेल.