नवी मुंबईः संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सध्या दुष्काळाचे सावट असल्याने लोकांना पिण्यासाठी पाणी मिळणे देखील कठीण झाले आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये ऐरोली, घणसोली, तळवली, गोठिवली, राबाडा, दिघा या भागात सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी महापालिकेच्या पाईपलाईनमधून पाणी पुरवठा केला जात असल्याची बाब लक्षात येताच महापालिकेच्या अधिकार्यांनी तत्काळ सदरचा पाणी पुरवठा खंडीत करण्याची कारवाई केली. याविषयी ऐरोली आणि दिघ्याचे मुख्य पाणी पुरवठा अभियंता अजय पाटील यांनी सांगितले की राज्यात पाण्याअभावी सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती ओढवलेली असताना पाणी बचतीसाठी विविध शासकीय प्राधिकरणांमार्फत पाणी बचतीसाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरण क्षेत्रात पाऊस कमी पडल्याने येत्या जून-जुलै पर्यंत पाणी साठा शिल्लक ठेवण्यासाठी महापालिका पाणी पुरवठा विभागामार्फत विविध मार्गाने प्रयत्न सुरु आहेत. त्याअनुषंगाने नवी मुंबई शहरात महापालिकेच्या वतीने पाणी कपात केली जात असून काही ठिकाणी एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे.
अशातच ऐरोली, घणसोली, तळवली, गोठिवली, राबाडा, दिघा या भागात सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांसाठी महापालिकेच्या पाईपलाईनमधून बेकायदेशीररित्या पाणी वापरले जात आहे. सदर ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असल्याची बाब महापालिका अधिकार्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे महापालिकेच्या पाणी ुरवठा विभागातील अधिकार्यांनी ऐरोली, सेक्टर-3, 4,16,17 ऐरोली गांव, दिवा गांव येथील जवळपास 51 नळजोडण्यांचा पाणी पुरवठा खंडित केला. याशिवाय दिघ्यातील 4 अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करत सदर इमारतींची नळजोडणी देखील खंडित करण्यात आली. तर ऐरोली दिघा विभागातून 51 आणि घणसोली विभागातून 46 अशा एकूण 97 नळजोणींचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा अभियंता अविनाश जाधव यांनी दिली. यामुळे महापालिकेचे तब्बल 97 हजार लिटर पाणी प्रतिदिन वाचणार असल्याचे जाधव म्हणाले.
पाणी पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीकोनातून गेल्या काही महिन्यांपासून घणसोली विभाग कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कठोर भूमिका घेतानाच या बांधकामांना जर महापालिकेच्या पाईपलाईन मधून पाणी पुरवठा होत असेल तर अशा बांधकामांवर त्वरित कारवाई करुन त्यांची नळजोडणी खंडित करण्याची कारवाई केली जात आहे. याअंतर्गत नोसिल नाका, तळवली, घणसोली कॉलनी, घणसोली गाव गावठाण अशा 46 नळजोडण्या खंडित केल्या आहेत. यामध्ये चालू बांधकामे 16, झोपडपट्टी भागात 19 आणि अनधिकृत नळजोडणी 11 अशा एकूण 46 नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत.