गाळ न काढल्याने लोक संतप्त
मुंबई : पावसाळा जवळ आलेला असतानाही नाले सफाईचे काम मुंबईत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे नाले तुंबण्याच्या व घरात पाणी घुसण्याच्या भीतीने लोकांमध्ये नाराजी आहे. मिठी नदीतून अद्यापी गाळ न काढण्यात आल्याने संतप्त लोकांनी गुरूवारी ठेकेदाराला मारहाण केली. दुसरीकडे मनपा प्रशासनाकडून मात्र मिठी नदीतून 50 टक्के गाळ काढल्याचा दावा केला आहे.
मिठी नदीच्या सफाईचा ठेका एस एन बी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा या कंपनीला देण्यात आला. गेल्या दीड महिन्यापासून नालेसफाईचे काम सुरू आहे. गुरूवारी नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी नाल्यातील सफाई कामाचा आढावा घेतला. या वेळी माजी नगरसेवक कप्तान मलिक यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. टॅक्सी मेन्स कॉलनीती रहीवाशांनी नालेसफाईच्या कामाबाबत ठेकेदाराला विचारणा केली असता ठेकेदार संतप्त झाला. यामुळे रहीवाशांनी ठेकेदाराला बेदम मारहाण केली. ठेकेदाराचे नाव सुनिल असून ठेकेदारांनी याप्रकरणी रहीवाशांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ठेकेदार महापालिकेची व लोकांची दिशाभूल करत असल्याचे माजी नगरसेवक कप्तान मलिक यांनी सांगितले. 50 टक्के नालेसफाईचा दावा करण्यात आला असला तरी मिठी नदी आजही गाळाने व कचर्यांने भरलेली आहे. लोकांना उत्तर देण्याएवजी ठेकेदाराने शिवीगाळ केल्याने संतप्त लोकांनी त्यांना मारहाण केल्याचे मलिक यांनी सांगितले.