आयुक्त मुंढेसाहेब तुम्हीच सांगा, कामगारांनी जगायचे कसे?
सुजित शिंदे
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणार्या मूषक नियत्रंणच्या कामगारांना जून महिना संपला तरी एप्रिल महिन्याचे वेतन अद्यापि मिळालेले नाही. गेल्या काही वर्षापासून ठेकेदार वेळेवर वेतन देत नाही आणि महापालिका प्रशासन या मूषक कामगारांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे या कामगारांना महापालिका प्रशासन दरबारी वालीच राहीला नसल्याचे सातत्याने पहावयास मिळत आहे.
नवी मुंबई कार्यक्षेत्रात दिवसा व रात्री अशा दोन पाळ्यांमध्ये हे मूषक नियत्रंण कामगार काम करत आहेत. गणवेश, वीजेरी (टॉर्च), बूट , आरोग्य सुविधा, हॅण्ड मौजे (ग्लोव्हज) तसेच अन्य कोणत्याही सुविधा ठेकेदाराकडून तसेच मनपा प्रशासनाकडून उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. गावठाणात रात्रीच्या वेळी उंदीर मारताना त्यांना भटक्या कुत्र्यांचा तसेच गर्दुल्यांच्याही त्रासाचा सामना करावा लागतो. गेल्या काही वर्षापासून या कामगारांना पगार नेहमीच विलंबाने मिळत आहे. अनेक वर्ष या कामगारांनी अवघ्या ५ हजार रूपये वेतनावरच काम केले होते. आ. संदीप नाईक यांच्या निदर्शनास ही बाब आल्यावर त्यांनी या मूषक नियत्रंण कामगारांचे वेतन अन्य कंत्राटी कामगारांप्रमाणेच मिळावे याकरता पाठपुरावा केला. परिणामी या मूषक नियत्रंणच्या कामगारांना आजमितीला अन्य कंत्राटी कामगारांप्रमाणेच वेतन दिले जात आहे.
सध्या शाळा सुरू झाल्या आहेत. शालेय फी, ऍडमिशन, वह्या पुस्तके, शालेय स्टेशनरी खरेदी करण्यासाठी या कामगारांच्या हातात पैसा नाही. महापालिका आयुक्त मुंढे यांनी मूषक कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या मूषक कामगारांच्या बायका-मुलांकडून केली जात आहे. मूषक नियत्रंणच्या कामगारांना वेळेवर वेतन मिळावे व त्यांची आर्थिक ससेहोलपट संपुष्ठात यावी याकरता राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सुरज पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे लेखी मागणी केली होती.