सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : वृक्ष लागवडीसोबतच त्यांचे संगोपन गरजेचे असल्याचे मत शिवसेना नगरसेविका सरोज पाटील यांनी व्यक्त केले आहे. राज्यशासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित वृक्षरोपणाच्या कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी, शालेय विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढून वृक्ष संरक्षणासबंधी जनजागृतीही केली.
राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, विविध संस्था, मंडळे, शाळा, महाविद्यालये यांच्याकडून राज्यभर वृक्ष लागवडीचे आज नियोजन करण्यात आले होते. ह्या वनमहोत्सवाचे औचित्य साधून शिवसेना नगरसेविका सरोज पाटील व शिवसेना उपशहरप्रमुख रोहिदास पाटील यांनी नवी मुंबई महापालिका शाळा क्र. ३ च्या विद्यार्थ्यांसोबत प्रभाग क्र. १०१ मधील आग्रोळी तलावाचा सभोवताल परिसरात वृक्षारोपण केले. यावेळी, उपस्थितांना मार्गदर्शन करताना सौ. पाटील बोलल्या की, वृक्षाची लागवड करणे खूपच सोपे आहे परंतु, तदनंतर वर्षानुवर्षे त्याचे संगोपन करून सदर वृक्षास जिवंत ठेवणे खूपच जिकरीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.त्यामुळे, जीवित असणाऱ्या प्रत्येक वृक्षास टिकवणे ही नागरिकांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना नेहमीच समाजपयोगी कार्यात हिरहिरीने सहभागी होत असल्याचे सांगत, दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांच्या वेदना शिवसेनेने जाणल्या आहेत. त्यामुळे, राज्यशासनाच्या ह्या दोन कोटी वृक्ष लागवड उपक्रमात शिवसेनेचे संपूर्ण पदाधिकारी आणि कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत असल्याची माहिती शिवसेना उपशहरप्रमुख रोहिदास पाटील यांनी यावेळी दिली.