-‘जनसंवाद’ उपक्रमामध्ये आ.संदीप नाईक यांचा इशारा
-कोपरखैरणेवासीयांचा जनसंवाद उपक्रमाला भरगच्च प्रतिसाद
-उद्याने आणि विरंगुळा केंद्र, बीटचौकी, सीसीटीव्हीसाठी आमदार निधी देणार
– ४०० लेखी निवेदने सादर
नवी मुंबई, प्रतिनिधी
कोपरखैरणे विभागासाठी आज (ता.१०) झालेल्या आ.संदीप नाईक यांच्या लोकहितवादी ‘जनसंवाद’ उपक्रमास नागरिकांची उत्स्फूर्त आणि भरगच्च उपस्थिती लाभली. नागरिकांनी विविध विषयांवरील आपल्या लेखी समस्या यावेळी मांडल्या. महावितरणशी संबंधित समस्या गंभीर असल्याने यापुढे जर महावितरणने त्यांचा कारभार सुधारला नाही तर नागरिकांसमवेत रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशारा आ.नाईक यांनी याप्रसंगी दिला. सनदशीर मार्गाने आत्तापर्यंत बैठका घेतल्या. लेखी निवेदने दिली परंतु महावितरणची अनागोंदी सुरुच असून शहरात आत्तापर्यंत चार व्यक्ती वीजेच्या धक्क्याने मरण पावल्या आहेत, असे सांगून येत्या विधानसभेच्या अधिवेशनात महावितरणशी संबंधित विषय मांडणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमात नागरिकांनी विविध समस्यांची ४०० लेखी निवेदने आमदार नाईक यांना सादर केली.
कोपरखैरणे सेक्टर-४ च्या शेतकरी समाज हॉलमध्ये आज नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ऐरोली आणि घणसोली येथे यशस्वी ‘जनसंवाद’ हा उपक्रम पार पडल्यानंतर खास कोपरखैरणेकरिता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास महापालिका, महावितरण, सिडको, महानगर गॅस, शिधावाटप, वाहतूक नियंत्रण शाखा, जिल्हा प्रशासन, पोलिस यांच्यासोबतच महापौर सुधाकर सोनावणे आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
महानगर गॅसविषयी कोपरखैरणेतील नागरिक सौरव पांडे यांनी सेक्टर-११ परिसरात गॅस लाईन टाकण्यात आली आहे. गॅस लाईनकरिता अनामत रक्कम दिल्यानंतरही दोन वर्षात गॅस लाईन सुरु झाली नसल्याची बाब आ.नाईक यांच्या निदर्शनास आणून दिली. याविषयी गॅस निगमचे अधिकारी येटला यांनी सध्या काम प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. तर प्रभागातील नागरिकांना २४ तास गॅस सुविधा मिळावी याकरिता आत्तापर्यंत करण्यात आलेल्या कामकाजाच्या माहितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश आ.नाईक यांनी दिले.
वाहतूकविषयक समस्येवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. राजकुमार सिंग यांनी कोपरखैरणेतील सेक्टर-१/२ येथे होणार्या विनापरवाना पार्किंगची समस्या, महेश काऊलकर यांनी मिलेनियम बिझनेस पार्क येथे सकाळ आणि संध्याकाळी होणारी वाहतूककोंडी विषयीची समस्या मांडली. यावर आ.संदीप नाईक यांनी कोपरखैरणेतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वाहतुकीची नियमावली तयार करण्याच्या सूचना वाहतूक शाखेच्या अधिकार्यांना केल्या. शहरातील सिडकोच्या मोकळया भूखंडावर पार्किंग उभारण्यासंदर्भात सिडकोचे अधिकारी आणि महापौरांबरोबर चर्चा करणार असल्याचे सांगत पार्किंगविषयक लोकप्रतिनिधी, पोलिस आणि सिडकोचे अधिकारी यांची एक कमिटी लवकरच तयार करुन याचा लेखाजोखा त्या-त्या संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे मांडून ही समस्या कायमची सोडविणार असल्याचे आ.नाईक म्हणाले. कोपरखैरणेअंतर्गत पुलानजीक सिग्नल उभारणे, कोपरखैरणे ते पाचबीच मार्गावर अपघात रोखण्यासाठी रमलर बसविणे व आवश्यक त्याठिकाणी गतिरोधक तात्काळ बसविण्याच्या सूचना आ.नाईक यांनी वाहतूक शाखेच्या अधिकार्यांना केल्या.
महावितरणच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना शहरात असणार्या उघडया डी.पी.बॉक्समुळे वाढत्या शॉर्टसर्कीटच्या प्रकारांना सामोरे जावे लागत आहे तर महापे-कोपरखैरणे-कोपरीगाव याठिकाणी वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा, वाढीव बिलांमुळे नाहक सोसावा लागणारा आर्थिक भुर्दंड, गावठाण भागात उघडया विद्युत वाहिन्यांमुळे होणारे अपघाताचे प्रकार अशा विविध समस्या आ.नाईक यांच्याकडे नागरिकांनी मांडल्या. उघडया डीपी आणि केबलमुळे आत्ता पर्यंत शॉक लागून चार नागरिकांचा बळी गेल्याबद्दल आ.नाईक यांनी अधिकार्यांना फैलावर घेतले. अशा प्रकारच्या घटनांना अधिकार्यांनाच जबाबदार धरणार असल्याचे ते म्हणाले. महावितरणच्या गंभीर प्रश्नी नागरिकांसमवेत रस्त्यावर उतरण्याचा इशारा आ.नाईक यांनी यावेळी दिला. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात याविषयी लक्षवेधी मांडणार असल्याचे आ.नाईक यांनी सांगितले. महापालिकेकडून रस्ता खोदण्यास परवानगी न मिळाल्याने काही ठिकाणी केबल टाकण्याचे काम रखडल्याचे महावितरणचे अधिकारी महेश पाटील यांनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिले. याविषयी लवकरच अधिकार्यांशी समन्वय साधून परवाने प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना महापौर सोनावणे यांना आमदारांनी केल्या.
‘जनसंवाद’मध्ये आरोग्य सुविधा, कायदा आणि सुव्यवस्था, सिडको आणि महावितरण, शिधावाटप विषयांवर देखील नागरिकांनी आपले लेखी निवेदन सादर केले. ‘जनसंवाद’ कार्यक्रमात महापालिकेने कारवाई केलेल्या फेरीवाल्यांनी देखील निवेदन सादर केले. त्यावर आ.नाईक,लोकनेते गणेश नाईक यांनी फेरीवाला पॉलिसीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. शासन स्तरावर याला परवानगी मिळाली असून येत्या महासभेत फेरीवाला धोरण निश्चित करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन महापौर सोनावणे यांना केले.
‘जनसंवाद’ कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी वर्ग आणि नागरिक एकाच व्यासपीठावर येतात. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या समस्या युध्द पातळीवर सुटत आहेत, हे आजच्या ‘जनसंवाद’ उपक्रमातून पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.पालिकेशी संबंधित विषयावर आपण आ.नाईक यांनी मांडलेल्या सूचनांचा चर्चा करुन त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत.- सुधाकर सोनावणे, महापौर.
‘जनसंवाद’ हा उपक्रम विकासाकडे, प्रगतीकडे नेणारा उपक्रम ठरला आहे. याचा मला अभिमान आहे. ‘जनसंवाद’ कार्यक्रमातून जाणून घेतलेल्या समस्यांपैकी जवळजवळ ७० टक्कयांहून अधिक समस्यांची तात्काळ सोडवणूक झाली आहे. ऐरोली, घणसोली आणि कोपरखैरणेतील तळागाळातील नागरिकांना न्याय देण्याचा या उपक्रमातून प्रयत्न केला आहे. शहराच्या प्रगतीसाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. दर दोन महिन्यांनी प्रत्येक विभाग स्तरावर ‘जनसंवाद’ हा उपक्रम घेतला जाणार आहे.- संदीप नाईक, आमदार.