आडत वसूलीवर शनिवारी तोडगा
नवी मुंबई : राज्य सरकार आणि एपीएमसीच्या घाऊक व्यापाऱ्यांच्या बुधवारच्या बैठकीनंतर गुरूवारपासून नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारपेठेत शेतकऱ्यांचा भाजीपाला आला. आडत न घेण्याच्या अटीवर संप मागे घेतला, खरा पण सरकारच्या निर्णयाप्रमाणेचगुरूवारी आठ टक्के आडतही खरेदीदारांकडून वसूल केली गेली. याला विरोध करत गुरूवारी खरेदीदारांनी भाजीपाला खरेदीवर बहिष्कार टाकला होता. मात्र येत्या शनिवारी 8 टक्के आडत वसुलीवर बैठक घेवून तोडगा काढू, सध्यातरी कोणाकडूनही आडत वसूल केली जाणार नसल्याचा निर्णय घाऊक व्यापाऱ्यांनी घेतल्याने नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेत आलेल्या ५०० गाड्यांमधील १३०० टन भाजीपाला मुंबईत दाखल झाला.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदीदारांकडून सुरुवातीला आठ टक्के आडत वसुली करण्यात आली. पण खरेदीदारांनी आडत न भरता भाजीपाला खरेदीवर बहिष्कार टाकला. आडत कोण भरणार यावरुन वाद झाल्याने काही काळ बाजार समितीमधील मार्केटमधला व्यवहार काही काळ ठप्प झाले होते. शेवटी किरकोळ आणि घाऊक व्यापारी अशा दोघांकडून आडत न घेता शेतमाल खरेदीचा व्यवहार सुरू करण्यात आला. आडत कोण भरणार यावर शनिवारी बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. संप मिटल्यानंतर गुरूवारी ५०० गाड्यांमधून १३०० टन भाजीपाला नवी मुंबईत दाखल झाला. या पाचशे गाड्यांपैकी ३०० गाड्या भाजीपाला मुंबई शहरात दाखल झाला.
· आवक वाढली
नवी मुंबईतल्या एपीएमसी बाजार पेठेत गुरूवारी कांदा बटाट्याची विक्रमी आवक झाली. दररोज साधारण १५० गाड्या कांदा-बटाट्याची आवक होत असते. मात्र गुरूवारी ही आवक ३०० गाड्यांवर पोहोचली. यामध्ये १७९ गाड्या कांदा तर १११ गाड्या बटाट्याची आवक झालीय. ही आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे कांदा बटाटा मार्केटमध्ये ८ टक्के आडत वसुली वरून कोणताही वाद
झालेला नाही. ८ टक्के आडत ही किरकोळ व्यापाऱ्यांकडून वसूल करण्यात आली. यामुळे कांदा बटाटा सुरूळीतपणे मुंबईत दाखल झाला आहे.
· भाज्याचे दर उतरले
गुरूवारी एपीएमसीतील व्यापाऱ्यांनी बंद मागे घेतल्यामुळे भाज्यांचे भाव किरकोळ बाजारात तुलनेने कमी झाले आहेत. दोन दिवस सुरू असलेल्या संपामुळे भाजीपाला प्रत्यक्ष बाजारात कमी प्रमाणात पोहचत होता. त्यामुळे भाज्यांचे दर चढे होते. आज भाव तुलनेने कमी झाल्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळला आहे. त्यामुळे ग्राहकांकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.