ठाणे : येथील चेकमेट सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीवर दरोडा टाकून सुमारे ११ कोटींची रोकड लुटणार्या १६ पैकी पाच आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश ठाणो न्यायालयाने दिले आहेत. आतापर्यत १० कोटींची रोकड हस्तगत केली असून आणखीही काही रोकड या आरोपींकडून मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
या दरोड्यातील वैभव लहांमगे (२३), लकी ऊर्फ लक्ष्मण सुधाकर गोवर्धने (२१, रा. दोघेही इगतपुरी, नाशिक), हरिभाऊ वाघ (४३, रा. चिंचोळेगाव, नाशिक) आणि भास्कर ऊर्फ भरुण संतोष शिंदे (३६, रा. सातपूर, नाशिक) या चौघांच्या पोलीस कोठडीची मुदत १५ जुलै रोजी संपली. त्यामुळे त्यांना ठाणो न्यायालयात गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-५ च्या पथकाने हजर केले होते. या सर्वच आरोपींकडून आणखी रोकड मिळण्याची शक्यता असून ते वारंवार पोलिसांची दिशाभूल करीत आहेत. याच कारणास्तव त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली. यातील पोलीस आणि आरोपींची बाजू पडताळून न्यायालयाने त्यांना १८ जुलैपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तर गुरुवारी नाशिक भागातून अटक केलेल्या मीनीनाथ चव्हाण (२६, रा. माणिकखांब, नाशिक) यालाही न्यायालयाने २२ जुलैर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
…………
किरण आणि वैभवकडे मिळाली २७ लाखांची रोकड
ठाणो पोलिसांनी किरण साळुंखे आणि वैभव लहांमगे यांच्या घरांची गुरुवारी पुन्हा झडती घेतली. त्यात किरणकडे १६ लाख ४४ हजार तर वैभवकडे ११ लाख ५० हजारांची रोकड मिळाली. त्यामुळे हस्तगत केलेली रोकड १० कोटी २५ हजारांच्या घरात गेली आहे. या १६ जणांच्या चौकशीत आणखीही रोकड मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली जात आहे.