अनंतकुमार गवई
नवी मुंबई : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबईतील गांवठाण क्षेत्रात प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर सुरु केलेली कारवाई त्वरित थांबवावी. अन्यथा येत्या विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आयुक्तांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याचा इशारा आ.मंदाताई म्हात्रे यांनी दिला आहे.
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी नैसर्गिक गरजेपोटी बांधलेली घरे अनधिकृत ठरवून ती पाडण्याची सिडको आणि नवी मुंबई महापालिकेची मोहिम प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करणारी असून दोन्ही प्रशासनाच्या विरोधात ‘बेलापूर’च्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली सुमारे वीस हजार घरे अधिकृत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा केवळ शासन निर्णय (जीआर) निघणे बाकी आहे. त्यामुळे जीआर निघेपर्यंत प्रकल्पग्रस्ांनी गरजेपाटी बांधलेली घरे तोडण्याची मोहिम महापालिका आणि सिडको प्रशासनाने थांबवली नाही तर सदर दोन्ही प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा आ. मंदाताई म्हात्रे यांनी दिला आहे.
दरम्यान, गांवठाणामधील प्रकल्पग्रस्तांच्या घरांवरील कारवाई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थांबवली नाही तर येत्या विधीमंडळात त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणण्याचा निर्धारही आमदार म्हात्रे यांनी बोलून दाखविला. महाराष्ट्र विधी मंडळाच्या आगामी सुरू होणार्या अधिवेशनामध्ये महापालिकेच्या तसेच ‘सिडको’च्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांवर होणारी कारवाई, गावठाण विस्तार योजनेची अंमलबजावणी न होणे, दिघ्यातील हायकोर्टाने अनधिकृत ठरवलेल्या इमारतींना संरक्षित कारण्यासंदर्भातील बालक-विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व्यासपीठ मिळावे, नवी मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविणेबाबत शासनाचा निर्णय, सिडको कार्यक्षेत्रातील पुरातन मंदिरांना अतिक्रमण विभागाकडून मिळणार्या नोटिसा तसेच मंदिरे वाचवण्यासंदर्भात शासनाची भूमिका, नवी मुंबईतील अडवलीभुतवली परिसरात नियोजित प्रादेशिक उद्यानासाठी जमीन राखीव असणे, फ्री-होल्ड जमिनी, आदि अनेक प्रश्न आमदार मंदाताई म्हात्रे शासनदरबारी ठेवणार आहेत. त्याची माहिती आमदार म्हात्रे यांनी १४ जुलै रोजी पत्रकार परिषदेत दिली. नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरु केलेल्या धडक कारवाईच्या विरोधात आता ‘भाजपा’च्याच आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आक्रमक पवित्रा घेत नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या बाजुने आंदोलनात उडी घेतली आहे. यासंदर्भात आमदार म्हात्रे यांनी १४ जुलै रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवी मुंबईतील ग्रामस्थांनी आपल्या न्याय हक्कांसाठी एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन केले आहे.
नवी मुंबई महापालिका आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी शहरातील अनधिकृत बांधकामे, मार्जिनल स्पेस मधील व्यवसाय तसेच गांवठाण क्षेत्रात प्रकल्पग्रस्तांकडून बांधण्यात आलेल्या गरजेपोटी घरांवर धडक कारवाई सुरु केलेली आहे.यामुळे नवी मुंबईतील प्रकल्प्रस्तांमध्ये आयुक्त मुंढे यांच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे. महापालिका प्रशासनाने नुकत्याच तुर्भे गावातील ग्रामस्थांना नोटिसा धाडलेल्या आहेत. त्यामुळे तुर्भे गावातील सर्वपक्षीय नगरसेवक, आजी-माजी विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी आपल्या नेतृत्वाखाली लढा देण्याचा निर्धार केल्याचे आ.मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सिडको आणि महापालिका प्रशासनाने गेल्या ४० हुन अधिक वर्षे रेंगाळत ठेवला आहे. सदर दोन्ही प्रशासनाविरोधात प्रकल्पग्रस्तांची नाराजी अनेकदा प्रकल्पग्रस्तांचे नेते आणि राजकीय नेत्यांनी वरिष्ठांना बोलूनही दाखवली आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे प्रकल्पग्रस्तांविरोधातील कारवाई थांबवत नसल्याने अखेर मुंढेंच्या कार्यपध्दती विरोधात आपल्याला आंदोलन छेडावे लागणार आहे. नवी मुंबईतील गांवठाण क्षेत्रात प्रकल्पग्रस्तांकडून गरजेपोटी बांधण्यात आलेली घरे नियमित करण्याचा शासनाचा विचार असून लवकरच त्यासंदर्भात अध्यादेश काढण्यात येईल असे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनादरम्यान सभागृहात सांगितले आहे. मात्र, याची जाणिव सनदी अधिकार्यांना असून देखील ते गांवठाणातील प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर कारवाई कशी काय करतात? असा सवाल आ. मंदाताई म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. तसेच ‘सिडको’नेही नवी मुंबईतील गांवठाण विस्ताराचा मुद्दा अद्याप प्रलंबित ठेवला आहे. याचाही मुद्दा लवकरात लवकर निकाली काढण्यात यावा. त्याअनुषंगाने आपण लवकरच नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे आमदार म्हात्रे यांनी यावेळी स्पष्ट केले.
सदर पत्रकार परिषदेस आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह ‘भाजपा’चे नवी मुंबई अध्यक्ष रामचंद्र घरत, नगरसेवक दीपक पवार, नगरसेविका शुभांगी पाटील, शशिकला पाटील,जिल्हा उपाध्यक्ष मारुती भोईर, महासचिव निलेश म्हात्रे, डॉ. राजेश पाटील, युवा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, आदि उपस्थित होते.