* सोमवारी नवी मुंबई ‘बंद’चा इशारा
* मंदाताई म्हात्रे-तुकाराम मुंढे यांच्यात शाब्दिक खडाजंगी
नवी मुंबईः महानगरपालिकेत व सिडकोमध्ये अधिकारी येतील जातील, सत्ता असेल अथवा नसेल; पण नवी मुंबई प्रकल्पग्रस्त माझे बांधव आहेत. नवी मुंबईतील सर्व समाजबांधवांनी मला आमदार म्हणून निवडून दिले आहे. त्यामुळे समाजबांधवांसाठी भले मी सत्ताधारी पक्ष ‘भाजपा’ची आमदार असली तरीही रस्त्यावर उतरणार, असा निर्धार आ. मंदा म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. त्यामुळे आता आयुक्त मुंढे यांना काय करायचे ते करु दे. मी याआधीही विधी मंडळ सभागृहात प्रकल्पग्रस्तांसाठी वेळोवेळी प्रसंगी सत्ताधारी पक्षात राहूनही आवाज उठविलेला आहे. तेव्हा आता प्रकल्पग्रस्तांसाठी रस्त्यावर उतरणार. प्रकल्पग्रस्तांची घरे तोडण्यासंदर्भातील महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा बालहट्ट आम्ही नवी मुंबईकर कदापि पुरविणार नाही.
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांवर सुरु असलेल्या कारवाईवरुन ‘बेलापूर’च्या भाजपा आमदार मंदा म्हात्रे आणि नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात १५ जुलै रोजी शाब्दिक खडाजंगी झाली. प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांसंदर्भात राज्य सरकारचा लवकरच शासन निर्णय (जीआर) येणार असल्याने महापालिकेने गावठाण क्षेत्रात सुरु केलेली अतिक्रमण विरोधी मोहिम थांबवावी अशी विनंती करण्यास गेलेल्या आमदार मंदा म्हात्रे यांना आयुक्तांनी आपण हायकोर्टाच्या आदेशानुसार अतिक्रमण विरोधी कारवाई सुरुच ठेवणार असल्याचे स्पष्ट केल्याने महापालिकेच्या कारवाई
विरोधात नवी मुंबईत वातावरण तप्त झाले आहे. त्यामुळे येत्या २० जुलै रोजी ‘प्रकल्पग्रस्त कृती समिती’द्वारा सिडको आणि महापालिकेविरोधात छेडण्यात येणार्या आंदोलनाप्रसंगी ‘नवी मुंबई बंद’ करण्याचा नारा प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांनी दिला आहे.
तुर्भे येथील अनधिकृत बांधकामे तोडण्याबाबत उच्च न्यायालयाचे आदेश असल्याने गावठाण भागासह सर्वत्र विना परवानगी सुरु असलेली अनधिकृत बांधकामे कोणत्याही परिस्थितीत तोडण्यात येणार असल्याचे ठाम वक्तव्य नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
१५ जुलै रोजी महापालिकेतर्फे तुर्भे गावातील अनधिकृत बांधकामे तोडण्यात येणार होती. मात्र, पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने महापालिकेच्या कारवाईला खो बसला. महापालिकेच्या कारवाई विरोधात गेल्या आठवडाभरापासून प्रकल्पग्रस्तांमध्ये सुरु असलेल्या धुसफुशीमुळे सर्वच गावांमध्ये वातावरण तप्त झाले आहे. १४ जुलै रोजी महापालिकेला इशारा देवून देखील अतिक्रमण विभागाने १५ जुलै रोजी तुर्भे गावात अतिक्रमण विरोधी मोहिम आखली होती. त्यामुळे महापालिकेच्या कारवाईला विरोध करण्यासाठी तुर्भे येथील ग्रामस्थ शेकडोंच्या संख्येने एकत्र जमले होते. मात्र, पोलीस बंदोबस्त न मिळाल्यामुळे महापालिकेला सदर कारवाई तुर्तास स्थगित करण्यात आली. अखेरीस संतप्त झालेले तुर्भे ग्रामस्थ आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्तांची भेट घेण्यास मुख्यालयात गेले. यावेळी आ. मंदा म्हात्रे यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांवर कारवाई करू नका, अशी त्यांना विनंती केली. मात्र, आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करीत असल्याचे स्पष्ट केले. तसेच आपण जानेवारी २०१३ पासून विनापरवानगी बांधण्यात आलेल्या बांधकामांवर कारवाई करीत असल्याचे मुंढे यांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेत आलेल्या संतप्त जमावाने आयुक्त आणि महापालिकेच्या निषेधार्थ घोषणा देत महापालिका दणाणून सोडली.
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी घरे नियमित करण्यासंदर्भात शासन सकारात्मक भूमिका घेत असताना प्रकल्पग्रस्तांची सदर घरे तोडण्याच्या आयुक्तांच्या अट्टाहासाबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे आ. मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त सिडको आणि महापालिकेच्या कारवाईमुळे चिथावला गेला असून स्वतःच्या न्याय हक्कासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याच्या मनस्थितीत आला आहे. त्यामुळे शहरात कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घणसोली दंगलीसारखी परिस्थिती उद्भवल्यास त्यास सर्वस्वी महापालिका आणि सिडको व्यवस्थापन जबाबदार राहणार असल्याची बाब आमदार मंदा म्हात्रे यांनी ‘नवी मुंबई’चे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. नवी मुंबई पोलिसांनी सदर बाब वेळीच ध्यानात घेऊन शासनास अवगत करावे, असे आमदार म्हात्रे यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे.
सोमवारनंतर कारवाई करणारच – आयुक्त मुंढे
तुर्भे येथे सुरू असलेली अनधिकृत बांधकामे संबंधितांनी सोमवारपर्यंत स्वत:हून तोडून टाकावी. अन्यथा सोमवारनंतर आपण कारवाई करणारच, असे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी स्पष्ट केले.