अनंतकुमार गवई
नवी मुंबई: कारच्या काचा फोडून त्यातील किंमती ऐवज चोरणार्या चोरट्यांनी सीबीडी येथील ‘सिडको’च्या रायगड भवन कार्यालयाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या कारची काच फोडून लॅपटॉप आणि रोख रक्कम असा सुमारे ६० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली. सीबीडी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
सदर प्रकरणातील तक्रारदार अमित कोरडे मुंबईत गोरेगाव येथे राहण्यास असून १८ जुलै रोजी सकाळी ते कामानिमित्त सीबीडी येथील ‘सिडको’च्या रायगड भवन कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी आपली कार रायगड भवन सोमारील रस्त्यावर पार्क केली होती. त्यानंतर ते आपल्या रायगड भवन इमारतीत गेले. हिच संधी साधून चोरट्यांनी कोरडे यांच्या कारची काच फोडून कारमधील लॅपटॉप, चेकबुक, एटीएम कार्ड आणि रोख रक्कम असा सुमारे ६० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. दरम्यान, दिड तासानंतर कोरडे कारजवळ आल्यानंतर चोरीचा सदर प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.