* खाजगी उद्योजकांना मिळणार संधी
* जलवाहतूक महामंडळाची कार्यवाही प्रगतीपथावर
* आमदार संदीप नाईक यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री फडणवीस यांचे लेखी उत्तर
नवी मुंबई : प्रवासी फेरी सेवा, रो-रो सेवा, मालवाहतूक व पर्यटनासाठी खाजगी उद्योजकांना वापरण्यास देण्यासाठी राज्यातील जेटटींचे प्राथमिक सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून कार्यवाही प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पावसाळी अधिवेशनादरम्यान लेखी उत्तरात दिली आहे. ऐरोली विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संदीप नाईक आणि इतर सदस्यांनी या संबंधीचा लेखी प्रश्न विचारला होता.
राज्यातील सागरी किनार्यावर असलेल्या जेटटींचा विकास करुन त्यावर जलवाहतूक सुरु करण्यासाठी महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाने मे २०१६ मध्ये तत्वतः मंजुरी दिली असून जेटटींची दुरुस्ती केल्यानंतर प्रवासी वाहतुकीसाठी खाजगी उद्योजकांना परवानगी देण्यात येणार आहे काय? तसेच जलवाहतुकीचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जलवाहतूक महामंडळ स्थापन करण्यास मुख्यमंत्री महोदयांनी परवानगी दिली आहे काय? असे लेखी प्रश्न विचारण्यात आले होते. प्रवासी तसेच मालवाहतूकसेवा आणि पर्यटनाला चालना देणार्या जलवाहतूक महामंडळासंबंधी शासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती आमदार नाईक आणि इतर सदस्यांकडून विचारण्यात आली होती.
खाजगी उद्योजकांना प्रवासी सेवा, मालवाहतूक तसेच पर्यटन विकासाकरिता वापरावयास देण्यासाठी सुयोग्य जेटटींच्या निवडीसाठी प्राथमिक सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. यानंतर निविदा प्रक्रीयेतून खाजगी विकासकांची निवड करण्यात येणार आहे. जलवाहतूक महामंडळ स्थापन करण्यासाठी या महामंडळाची व्याप्ती, कामाचा वाव, अंमलबजावणी, यंत्रणा इत्यादी बाबी ठरविण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने नियुक्त केलेल्या सल्लागारांमार्फत कार्यवाही हाती घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.