- नवी दिल्ली : गांधी हत्येबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध केलेल्या विधानाबाबत माफी मागण्याऐवजी खटल्याला सामोरे जाण्याचा पवित्रा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतला आहे. संघाविरुद्धचे आपले विधान सिद्ध करण्यासाठी आपण पुरावे सादर करू, असे ते म्हणाले. राहुल यांनी गांधी हत्येबद्दल संघाविरुद्ध केलेल्या विधानाबाबत माफी मागावी; अन्यथा खटल्याला सामोरे जावे लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्यानंतर राहुल यांनी ही भूमिका जाहीर केली.
- गांधी यांच्या हत्येनंतर तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यांच्यात झालेला पत्रव्यवहार राहुल न्यायालयात सादर करतील, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. संघाविरुद्ध केलेल्या विधानावरून राहुल गांधी यांच्याविरुद्ध महाराष्ट्रातील न्यायालयात गुन्हेगारी अब्रूनुकसानीचा खटला सुरू आहे. तो रद्द करण्याची मागणी राहुल यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे याचिकेद्वारे केली होती. त्यावरील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने तुम्ही कोणाविरुद्ध जेव्हा बोलता तेव्हा सावधपणे बोलायला हवे, असे कडक शब्दांत सुनावले होते.
तसेच या विधानाबद्दल माफी मागावी किंवा खटल्याला सामोरे जावे, असे मतही नोंदविले होते. राहुल गांधी यांनी एका निवडणूक प्रचारसभेत गांधी यांच्या हत्येसाठी संघ जबाबदार असल्याचे विधान केले होते. त्यावरून त्यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. त्याची पुढील सुनावणी २७ जुलै रोजी होईल.
दरम्यान, संघाची भूमिका उघड व्हावी यासाठी काँग्रेस पुरावे गोळा करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधींच्या हत्येनंतर नेहरू यांनी पटेल यांना पत्र लिहून संघावर बंदी घालण्याचा सल्ला दिला होता. त्याच्या उत्तरादाखल पटेल यांनी लिहिलेले पत्र महत्त्वपूर्ण आहे.
कारण, या पत्रात त्यांनी स्पष्ट लिहिले आहे की, बापूंचा मारेकरी नथुराम गोडसे संघाच्या विचारसरणीने प्रेरित होता आणि महात्म्याच्या हत्येनंतर संघाने मिठाई वाटली होती. काँग्रेस राहुल यांचा बचाव करताना इतर कागदपत्रांसह हे पत्रही सादर करणार आहे.