- मुंबई : दादर येथील जमीनदोस्त करण्यात आलेल्या ऐतिहासिक आंबेडकर भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर व त्यांच्या समर्थकांना प्रवेश करण्यास शुक्रवारी उच्च न्यायालयाने मज्जाव केला. जबरदस्तीने या भवनात कोणी शिरकाव करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितावर थेट कारवाई करावी, असा आदेश पोलीस आयुक्तांना देत उच्च न्यायालयाने सोमवारपर्यंत हे बांधकाम ‘जैसे थे’ स्थितीत ठेवण्याचेही निर्देश दिले.
रातोरात आंबेडकर भवन पाडल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या समर्थकांना ३० जुलै रोजी श्रमदान करून पुन्हा एकदा आंबेडकर भवन उभारणार असे सांगितले. त्यामुळे पीपल इम्प्रुव्हमेंट ट्रस्टने उच्च न्यायालयात केलेल्या अर्जावर न्या. एस. जे. काथावाला यांच्यापुढे सुनावणी होती.
ट्रस्टने केलेल्या अर्जानुसार, आंबेडकर भवनाच्या आवारात असलेली तीन बांधकामे मोडकळीस आल्याने ती पाडण्यात यावीत, अशा आशयाची नोटीस महापालिकेने १ जून रोजी ट्रस्टला बजावली. महापालिकेने बजावलेल्या नोटीसनुसार, ट्रस्टने २५ जून रोजी आंबेडकर भवन पाडण्याचे काम सुरू केले. मात्र त्याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समर्थक प्रकाश आंबेडकरांसह भवनात शिरले आणि याच वेळी प्रकाश आंबेडकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समर्थकांना ३० जुलै रोजी एकत्र येऊन श्रमदान करून पुन्हा आंबेडकर भवन उभारण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)
*** बांधकाम ‘जैसे थे’ स्थितीत ठेवण्याचे निर्देश
‘या प्रकरणावरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत कोणीही येथे (भवनात) काहीही करू नये. हे बांधकाम ‘जैसे थे’ स्थितीत ठेवण्यात यावे,’ असे निर्देश न्या. काथावाला यांनी दिले. ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, आंबेडकर भवनात तीन बांधकामे होती. ही तिन्ही बांधकामे पाडण्यात आली आहेत. त्यापैकी एका बांधकामाचे मालक प्रकाश आणि आनंदराज आंबेडकर आहेत. प्रस्तावित १७ मजली बांधकामामध्ये प्रकाश आणि आनंदराज आंबेडकर यांना कामकाज करण्याची परवानगी दिली जाईल, असेही ट्रस्टने स्पष्ट केले.