पालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या बसगाड्यांचीही स्टेशन परिसरात अनेकदा अडवणूक करण्यात येते. तोच प्रकार आता ओला, उबर, मेरू अशा आधुनिक टॅक्सीसेवांच्या बाबतीत सुरू झाला आहे. या सेवेला प्रवाशांची पसंती मिळत असल्याचे पाहून रिक्षावाल्यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्याच नावाने फलकबाजी केली. कल्याण स्थानक परिसरात अशा वाहनांना प्रतिबंध असल्याची दिशाभूल करण्यास सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे रिक्षावाल्यांनी केलेल्या बेकायदेशीर कृत्याशी आमचा कोणताही संबंध नसल्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
या संदर्भात कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांना विचारले असता ते म्हणाले, टूरिस्ट टॅक्सीवाल्यांना स्वतःची पार्किंग करता येत नाही. पिकअप आणि ड्रॉप व्यतिरिक्त त्यांना सार्वजनिक ठिकाणी आपापली वहाने पार्क करता येत नाहीत, हे मान्य आहे. परंतू रिक्षावाल्यांनी माझ्या पदाचा गैरवापर केला आहे. अशा बेकायदा फलकांच्या विरोधात आपण कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.