मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर महाड-पोलादपूर दरम्यानचा सावित्री नदीवरचा जुना पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याच्या पार्श्वभूमीवर कोकणातील ३६ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
कोकणातील ३६ पुलांचे ऑडिट करून १५ दिवसांत अहवाल सादर करण्याची सूचना शिंदे यांनी पीडब्ल्यूडी सचिव (रस्ते) सी. पी. जोशी यांना दिली आहे. पुढील महिन्यांत येणाऱ्या गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर मुंबईतील चाकरमानी कोकणातील आपल्या मूळ गावी जातील. त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, तसेच दुर्घटना होऊ नये, यासाठी तातडीने या पुलांचे, विशेषत: ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.