तुर्भ्यातील जनता मार्केटकडे जाण्यासाठी स्कायवॉक
आमदार संदीप नाईक यांचा पाठपुराव्याचे फलित
नवी मुंबई : पायाभूत सुविधांमुळे शहरविकासाला गती मिळत असते. नवी मुंबईत दळणवळणाच्या सोयी निर्माण व्हाव्यात यासाठी आमदार संदीप नाईक हे सातत्याने शासकीय पातळीवर पाठपुरावा करीत असतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे कोपरखैरणे ते विक्रोळी या पुलाच्या कामास गती मिळाली असून हे काम लवकरच सुरु होणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर दोन रेल्वे स्थानकांच्या मध्ये असलेल्या तुर्भेतील प्रसिध्द अशा जनता मार्केटकडे जाण्यासाठी स्कायवॉकची निर्मिती देखील केली जाणार आहे. या विषयांसदर्भात आमदार नाईक यांनी विधीमंडळ अधिवेशनात विचारलेल्या अतारांकीत प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरे दिली असून त्यामध्ये नवी मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी नमूद आहे.
नवी मुंबई आणि मुंबई या दोन शहरांना कमी वेळेत कनेक्ट करणारा कोपरखैरणे ते विक्रोळी या पुलाची निर्मिती व्हावी, यासाठी आमदार नाईक प्रयत्नशील होते. एमएमआरडीएच्या माध्यमातून हा पूल बांधण्यात येणार आहे. या पुलासंबधीचा फिजिबिलीटी अहवाल तयार करण्यात आला आहे काय? असा प्रश्न त्यांनी शासनास विचारला होता. मेसर्स एन.पी. ब्रिजींग या सल्लागाराची या कामासाठी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी लेखी उत्तरात दिली आहे. या पुलाच्या मुंबई आणि नवी मुंबईकडील बाजूच्या व्यवस्थेकरीता मुंबई महापालिका, मुंबई वाहतुक पोलीस, नवी मुंबई महापालिका, सिडको, एमआयडीसी आणि नवी मुंबई वाहतुक पोलीस यांच्याशी सल्लागार कंपनी चर्चा करुन याबाबतचा अंतिम अहवाल तयार करण्याचे काम सल्लागाराकडून प्रगतीपथावर असल्याचे उत्तरात शेवटी नमूद करण्यात आले आहे. कोपरखैरणे ते विक्रोळी हा पुल झाल्यावर नवी मुंबईतून मुंबईत तसेच मुंबईतून नवी मुंबईत फक्त १० ते १५मिनिटांत पोहचणे शक्य होणार आहे. तसेच नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबईतील अस्तित्वातील विमानतळ या दरम्यान कनेक्टीव्हिटी तयार होणार आहे.
जनता मार्केटसाठी स्कायवॉक..
नवी मुंबईतील तुर्भे आणि सानपाडा रेल्वे स्थानकांच्या मध्ये प्रसिध्द जनता मार्केट आहे. या मार्केटमध्ये नागरिक मोठया संख्येने खरेदीसाठी येत असतात. या सर्वांना जीव धोक्यात घालून रेल्वेरुळ ओलांडून मार्केटमध्ये जावे लागते. या ठिकाणी स्कायवॉक उभा रहावा, यासाठी आमदार नाईक सक्रीय होते. सिडको या ठिकाणी स्कायवॉक बांधणार आहे काय? असा प्रश्न त्यांनी शासनाला विचारला होता. या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून पादचारी पुल बांधणे प्रस्तावित असल्याचे लेखी उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. डिपॉजिट टर्म बेसिसवर हा पूल बांधला जाणार असून तो बांधण्यासाठी ६,७४,६७,४५५ एवढी रक्कम रेल्वे प्रशासनास अदा करण्यास नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. ही रक्कम अदा करण्यापूर्वी महापालिका आणि रेल्वे प्रशासन या दोन प्राधिकरणांमध्ये होणार्या करारनाम्याची कार्यवाही सध्या प्र्रगतीपथावर आहे. हा पादचारी पूल अस्तित्वात आल्यावर जनता मार्केटमध्ये जाणारे हजारो नागरिकआणि प्रवासी सुरक्षीत होणार आहेतर्.ें
प्रकल्पग्रस्तांसाठी रोजगार माहितीकेंद्र…
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरु ठेवण्यासाठी अलिकडेच आमदार संदीप नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर ही योजना सुुरु राहणार असल्याचे सिडकोतर्फे कळविण्यात आले होते. प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा आणि कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे यासाठी सिडको कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करणार आहे काय? असा प्रश्न आमदार नाईक यांनी विचारला असता बेलापूर रेल्वे स्थानक कॉम्प्लेेक्सच्या टॉवर क्रमांक ५ मध्ये सिडकोतर्फे खास कौशल्यविकास कार्यक्रम सुरु करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री महोदयांनी या प्रश्नाला लेखी उत्तरात दिली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना रोजगारांच्या संधीची माहिती या कार्यक्रमातून मिळते.