विधानभवन आवारात निदर्शने
नवी मुंबई : नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी तसेच दिघा येथील सर्वसामान्यांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करावीत, या मागणीसाठी आमदार संदीप नाईक यांनी आज विधानसभा आवारात विरोधी पक्षाच्या आमदारांसह सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.
सिडकोने वेळोवेळी गावठाण सर्व्हेक्षण केले नाही. काळाच्या ओघात प्रकल्पग्रस्तांची कुटुंब वाढली. त्यामुळे राहण्यासाठी तसेच उदरनिर्वाहासाठी त्यांनी गरजेपोटी घरांचा विस्तार केला. आजपर्यतची ही बांधकामे नियमित करावीत आणि ग्रामस्थांच्या सुचनांचा समावेश करुन नवीन गावठाण विस्तार योजना जाहिर करावी, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली. एमआयडीसीच्या जागेवरील दिघ्यातील इमारतींमधून सर्वसामान्य नागरिक राहत आहेत. ज्याप्रमाणे कॅम्पा कोला ही उच्चभू्र सोसायटी नियमित करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला त्याच धर्तीवर माणुसकीच्या दृष्टीने दिघ्यातील बांधकामे नियमित करण्यासाठी लवकरात लवकर उच्च न्यायालयात टिकेल असे धोरण जाहिर करण्याची मागणी देखील आमदार नाईक यांनी केली. या दोन्ही घटकांची बांधकामे नियमित करण्याचे आश्वासन देवूनही सरकारने या आश्वासनांची अद्याप पुर्तता केली नसल्याबददल आमदार नाईक यांनी संताप व्यक्त केला.
आमदार पांडुरंग बरोरा, आमदार निरंजन डावखरे, आमदार अवधूत तटकरे, आमदार वैभव पिचड, आमदार आनंद ठाकुर, आमदार राहूल नार्वेकर, आमदार राहूल जगताप आदी या आंदोलनात आमदार नाईक यांच्या समवेत सामिल झाले होते.