मुंबई- सावित्री नदीवरील अपघातात मृत्यू पावलेल्या कुटुंबियांची काय व्यवस्था केली या प्रश्नावर रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता गुरूवारी अचानक भडकले आणि पत्रकारांना त्यांनी दमदाटी केली.
त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनीही पत्रकारांवर तोंडसुख घेतले. अडचणींचे प्रश्न विचारू नका, तुम्हाला उत्तर द्यायला मी बांधील नाही, तुम्हाला बघून घेईन, अशी उद्दाम भाषा वापरून प्रकाश मेहता यांनी मवाल्याच्या आवेषात पत्रकारांवरच शाब्दिक हल्ला केला.
त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आणि वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी आपल्या हातातले माईक मेहता यांच्यासमोर धरले तेव्हा या बाबूंना मी घाबरत नाही असे उद्दाम उत्तर दिले, मेहता यांनी हुज्जत घालायला सुरूवात केली. मेहता यांच्या तोंडात तेव्हा गुटख्याचा तोबरा भरलेला होता.
पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नाला धड उत्तर न देता सुमारे १० मिनीटे दमबाजीच्या आवेशातच प्रकाश मेहता बोलत होते. त्यांच्या या उद्दामपणाचा सर्व?पत्रकारांनी तीव्र निषेध केला असून उद्या विधानमंडळातही शेवटच्या दिवशी विरोधीपक्षाचे आमदार या उद्दामपणाविरोधात प्रकाश मेहता यांनी माफी मागितल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही.