नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत रस्ते, पदपथ, मार्जिनल स्पेस नागरिकांसाठी खुल्या रहाव्यात यादृष्टीने धडक मोहीमा हाती घेण्यात येत असून महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार नवीन अतिक्रमणे होऊ नयेत यावरही विभाग कार्यालयांमार्फत लक्ष ठेवले जात आहे.
या अनुषंगाने आज सेक्टर 11 वाशी येथील विनम्र स्वराज हॉस्पिटलमध्ये तळमजला व बेसमेंटमध्ये करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम निष्कासीत करण्यात आले. या हॉस्पिटलमध्ये तळमजल्यावर तसेच बेसमेंट मधील पार्कींगच्या जागेत रुम्स तयार करून त्याचा वाणिज्य वापर केला जात होता. याबाबत संबंधीतांना महाराष्ट्र नगररचना अधिनियम कलम 53(1) अंतर्गत नोटीसही बजाविण्यात आली होती. तरीही याबाबत काहीच प्रतिसाद न दिल्याने विनम्र स्वराज हॉस्पिटल मधील अनधिकृत बांधकाम आज निष्कासीत करण्यात आले.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली, उपआयुक्त सुभाष इंगळे, सहा. आयुक्त डॉ. कैलास गायकवाड, वाशीचे विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके यांच्या वतीने ही धडक कारवाई करण्यात आली.
सध्या नवी मुंबईत अनेक ठिकाणी इमारतीतील पार्किंगच्या जागेत नागरिकांना अथवा अभ्यागतांना पार्किंग करु दिली जात नाही असे निदर्शनास आले आहे. यामुळे त्या भोवतालच्या भागात पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्याचप्रमाणे वाहतुक कोंडी होऊन रहदारीलाही नागरिकांना त्रास होत आहे. याकरीता महापालिका क्षेत्रातील सर्वच खाजगी व सार्वजनिक वापराच्या इमारतीतील पार्कींगच्या जागा सर्वांसाठी खुल्या करुन देण्याच्या सूचना संबंधीतांना देण्यात आल्या असून त्यांचे पालन न करणा-या इमारती / संकुलांवर यापुढील काळात अशाचप्रकारे धडक कारवाई करण्यात येणार आहे.