मुंबई : म्हाडाच्या मुंबईतील ९७२ घरांची सोडत १० ऑगस्टला होणार आहे. मुंबईत स्वत:चं घर असावं असं स्वप्न पाहणा-या अर्जदारांची नजर या तारखेकडे लागली आहे. या ९७२ घरांसाठी म्हाडाकडे तब्बल १.३५ लाख अर्ज आले आहेत. त्यामुळे यातील कुणाला घर मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- ही लॉटरीची सोडत बोरिवली, दहिसर, गोरेगाव, मालाड, मानखुर्द, चेंबूर, कुर्ला आणि पवई इथल्या घरांसाठीची आहे. १८० स्क्वेअर फूट ते ८०० स्क्वेअर फुटांची ही घरे आहेत. यावेळी आलेल्या अर्जांची संख्या बघता घरांच्या तुलनेत अर्ज खूपच जास्त आल्याने म्हाडावरील दबाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. येत्या ऑगस्टला लॉटरीची सोडत वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा येथे सकाळी ९ वाजल्यापासून सुरू आहे.
म्हाडातर्फे ९७२ घरांसाठी जाहीर करण्यात आलेल्या या लॉटरीची सोडत १० ऑगस्ट रोजी लागणार आहे. सर्वात स्वस्त घर अत्यल्प उत्पन्न गट मालवणी मालाडमध्ये आहे. त्याचा कारपेट एरिया १६.७२ चौरस मीटर इतका आहे. या घराची किंमत ८ लाख १७ हजार इतकी आहे. तर सर्वात महाग घर उच्च उत्पन्न गटातलं शैलेन्द्र नगर दहिसरमध्ये आहे. या घरांचा कारपेट एरिया ७८.४७ चौरस मीटर असलेल्या या घराची किंमत ८३ लाख ८६ हजार इतकी आहे.