** आमदार मंदाताई म्हात्रेंच्या पाठपुराव्याला यश
** लवकरच शासन निर्णय काढणार
** मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबईः नवी मुंबईतील गावठाणातील समस्या, ग्रामस्थांची गरजेपोटी बांधलेली घरे, जेटी आदींबाबत आमदार झाल्यापासून मंदाताई म्हात्रेंनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. या पाठपुराव्याला राज्य शासनानेही सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे नवी मुंबईतील प्रलंबित समस्या लवकरच सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आता २०१५ पर्यत ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली घरे कायम करण्यास मुख्यमंत्र्यांनी अनुकूल प्रतिसाद दिल्यामुळे आमदार मंदाताई म्हात्रे नवी मुंबईतील ग्रामस्थांच्या गळ्यातील तारणहार बनण्याची शक्यता राजकीय क्षेत्रात व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबईतील दिघा येथील डिसेंबर २०१५ पर्यंतची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत धोरण अवलंबणार असल्याची घोषणा चालू अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यानंतर आपण केलेल्या मागणीनुसार नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरेही २०१५ पर्यंत नियमित करण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी होकारार्थी उत्तर देऊन याबाबत लवकरच शासन निर्णय काढण्यासंदर्भात आश्वासन दिल्याची माहिती ‘बेलापूर’च्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, राज्य सरकारचा सदर शासन निर्णय प्रकल्पग्रस्त भूमीपुत्रांच्या हिताचा आणि भूमीपुत्रांना न्याय मिळवून देणारा असेल, असेही आमदार म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.
याशिवाय नवी मुंबईतील ‘सिडको’च्या धोकादायक इमारतीच्या पुनर्विकासासाठी ४ एफएसआय मंजूर करण्याबाबत वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे ‘सिडको’च्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये मंजूर फेरबदलास अंतिम मान्यता देताना कार्यवाही करण्यात येणार असून नवी मुंबई महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीमध्येही फेरबदलाची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
सदर पत्रकार परिषदेप्रसंगी ‘भाजपा’चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, ठाणे उपाध्यक्ष मारुती भोईर, माजी जिल्हाध्यक्ष भगवान ढाकणे, विजय घाटे, डॉ. राजेश पाटील आदि उपस्थित होते.