नवी मुंबई :काही दिवसांपूर्वीच खड्ड्यांमुळे चाळणी झालेल्या सायन पनवेल महामार्गाबाबत नवी मुंबई मनसेने आक्रमक पवित्रा घेत, शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली होती. सात दिवसांत जर सायन पनवेल महामार्गावरील खड्डे बुजविण्यात आले नाही तर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातील आसन व्यवस्थेसाठी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सर्व खुर्च्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते निषेध म्हणून पळवून नेतील असा इशारा मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप-अभियंते सतीश ओल्गार यांना दिला होता. त्याचे फलित म्हणून सायन पनवेल महामार्गाच्या डागडुजीचे काम मोठ्या प्रमाणात तात्काळ सुरु करण्यात आले असून, लवकरच हा महामार्ग खड्डे मुक्त होईल.
सायन पनवेल राज्य महामार्गाची दुर्दशा ही रस्त्यात खड्डे कि खड्ड्यांमध्ये रस्ता इतकी वाईट झालेली आहे. दरवर्षी करोडो रुपयांची कंत्राटे देऊन सुद्धा रस्त्यांची अशी दयनीय अवस्था होते व त्यावर काहीच ठोस कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जात नाही. सध्याच्या घडीला दोन चाकी वाहने व छोट्या वाहनांना सायन पनवेल महामार्ग प्रवासासाठी अत्यंत धोकादायक बनला असून, या पावसाळ्यात होणाऱ्या अपघातांची सर्व जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची व संबंधित रस्ते कंत्राटदारांची आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जीवघेणे अपघात नित्याने घडत आहेत. लोकांचा मौल्यवान वेळ देखील या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाया जात असतो. अवजड वाहनांच्या सततच्या ये-जा मुळे जवळपास पाच पाच फुटांचे खड्डे सायन पनवेल महामार्गावर पडले आहेत. त्यात भर पावसामुळे हे खड्डे जलमय झाले असून, त्यामुळे छोटी वाहने व दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. महामार्गाची झालेली हि सर्व दुर्दशा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळ्यांदेखत होत असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभाग ढिम्मपणे सर्व परिस्तिथी जैसे थे ठेवतात. सायन पनवेल महामार्गाच्या खड्ड्यांच्या डागडुजीची पाहणी मनसे रोजगार विभागाचे शहर सचिव आप्पासाहेब कोठुळे, सागर नाईकरे यांच्या नेतृत्वाखाली व मनसैनिकांच्या उपस्थितीत करण्यात आली.