विद्या लोखंडे-गवई
नवी मुंबई : प्लास्टिक हे पर्यावरणाला घातक असून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनानुसार सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा तीव्रतेने राबविण्यात येत आहेत. यामध्ये 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणा-या विक्रेत्यांकडील प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात येऊन त्यांच्याकडून दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येत आहे.
अशाच प्रकारची प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीम नेरुळ विभागाचे विभाग अधिकारी उत्तम खरात यांच्या नियंत्रणाखाली हाती घेण्यात येऊन सेक्टर 1 व शिरवणे परिसरातील 5 दुकानांमधून 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या 55 किलो पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच त्यांच्याकडून प्रत्येकी 5000/- याप्रमाणे 25 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.सेक्टर 1 नेरुळ येथील मॉडर्न लंच होम, सतरंज वेफर्स ॲण्ड फरसाण, एकता ऑईल डेपो, अन्नपूर्णा स्विट मार्ट, बिकानेर स्विट ॲण्ड स्नॅक्स या पाच दुकानांमधून 25 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.
त्याचप्रमाणे तुर्भे विभाग कार्यालय क्षेत्रात प्रभारी विभाग अधिकारी प्रशांत नेरकर यांच्या नियंत्रणाखाली प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमेअंतर्गत से.19, तुर्भे येथील सिध्दी ट्रेडींग, गाला ब्रदर्स व शोभा ट्रेडींग या दुकानांतून प्रत्येकी रू. 10 हजार तसेच जे.के.पेपर्स या दुकानातून रु. 5 हजार अशी चार दुकानांतून एकूण रू. 35 हजार दंडात्मक रक्कम आणि 200 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील व्यापारी, विक्रेत्यांनी पर्यावरणाची हानी करणा-या 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आपल्याकडे ठेवू नयेत तसेच नागरिकांनीही त्याचा वापर करणे टाळावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.