विद्या लोखंडे-गवई
नवी मुंबई : राष्ट्रीय स्तरावरील “द इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया)” या अभियांत्रिकी क्षेत्रातील नामांकित संस्थेच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता मोहन डगांवकर यांना “ख्यातनाम अभियांत्रिकी व्यक्तीमत्व (Eminent Engineering Personality)” या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे, महाराष्ट्र येथे संपन्न झालेल्या संस्थेच्या 32 व्या राष्ट्रीय अधिवेशनात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या शुभहस्ते,नॅशनल इन्वायरमेंट इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्युट चे संचालक डॉ. राकेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना हा पर्यावरण अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांनी केलेल्या विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल मानाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
इंदोर विद्यापिठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी संपादन केलेल्या मोहन डगांवकर यांनी पर्यावरण अभियांत्रिकी या वैशिष्टयपूर्ण क्षेत्रात व्हिजेटीआय, मुंबई येथून पदव्युत्तर पदवी (Master of Engineering) संपादन केली तसेच मुंबई विद्यापिठातून नागरी व्यवस्थापन क्षेत्रातील ॲडव्हान्स पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा यशस्वीरीत्या पूर्ण केला. मागील एक तपाहून अधिक काळ नवी मुंबईचे शहर अभियंता म्हणून त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण कामांचा उल्लेख पुरस्कार प्रदान करताना सन्मानाने करण्यात आला. नवी मुंबई हे इको-सिटी शहर म्हणून नावारुपाला आणण्यात मोहन डगांवकर यांच्या पर्यावरण विषयक अभियांत्रिकी दृष्टीचा व कार्यपध्दतीचा महत्वाचा वाटा आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वत:च्या मालकीचे 450 दललि. क्षमतेचे मोरबे धरण, 24 X 7 पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने धरणापासून नवी मुंबई पर्यंत टाकण्यात आलेली जलवाहिनी व गुरुत्वीय बलाने पाणीपुरवठा करण्याच्या कार्य प्रणालीमुळे 50टक्के उर्जा बचत तसेच या संपूर्ण जलवितरण प्रणालीवर स्काडा सारख्या अत्याधूनिक तंत्रप्रणालीव्दारे नियंत्रण याबाबींचा याप्रसंगी विशेष उल्लेख करण्यात आला.
कोपरखैरणे येथील जुनी क्षेपणभूमी शास्त्रोक्त पध्दतीने बंद करून त्याठिकाणी निसर्गोद्यान फुलविण्याचे पर्यावरणपूरक वैशिष्टपूर्ण कार्य त्यांनी केले आहे. शहरातील महत्वपूर्ण ठाणे बेलापूर मार्गाचे उत्तम काँक्रीटीकरण व विस्तारीकरण, शहरातील वाहतुक नियोजनाच्या दृष्टीने मुख्य चौकांचे पुर्ननियोजन करून त्याठिकाणी काँक्रीटीकरण, शहरातील महत्वाच्या वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावर आधारीत चित्रशिल्प वास्तुंची निर्मिती, पर्यावरण कक्ष स्थापन करून पर्यावरण प्रयोगशाळा, फिरती पर्यावरण प्रयोगशाळा, हवेतील घटकांचे मापन व नागरिकांच्या माहितीसाठी प्रदर्शन करणारी हवा गुणवत्ता सनियंत्रण केंद्रे, पर्यावरण व प्रदूषणाचे माहिती दर्शविणारे फलक विविध ठिकाणी प्रदर्शित करणे, तुर्भे येथे जमीन भरणा पध्दतीवर आधारीत शास्त्रोक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणे अशा माध्यमांतून शहरातील पर्यावरणाचे निरीक्षण व नियंत्रण तसेच वंडर्सपार्क सारख्या उल्लेखनीय मनोरंजन केंद्राची निर्मिती अशा मोहन डगांवकर यांच्या अभियांत्रिकी नियंत्रणाखाली झालेल्या अनेक उल्लेखनीय कामांबद्दल पुरस्कार वितरण समारंभात गौरवोद्गार काढण्यात आले.
यामध्ये देशातील वास्तूरचनेचा उत्तम नमुना समजल्या जाणा-या महापालिका मुख्यालय इमारतीस ग्रीन बिल्डींग गोल्ड मानांकन प्राप्त झाले असून असे मानांकन प्राप्त करणारी नवी मुंबई ही देशातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था आहे. मोहन डगांवकर यांच्या या पर्यावरणशील कार्याचेही यावेळी कौतुक करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता मोहन डगांवकर यांना देशातील अभियंत्यांच्या “द इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया)” या नामांकीत संस्थेने हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केल्याने नवी मुंबई महानगरपालिकेस आणखी एक राष्ट्रीय गौरव प्राप्त झाला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.