नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या देशभरात नावाजल्या जाणा-या ‘etc’ अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्रास क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया यांचे प्रमुख सल्लागार डाॅ. अनिल के. श्रीवास्तव यांनी भेट दिली. ही भेट क्यू.सी.आय.- डी.एल. शाह 2016 च्या पुरस्कार सोहळयाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे प्राथमिक निरीक्षण व उपलब्ध संसाधन परिक्षण याकरीता होती.
‘इटीसी’ केंद्र हे महापालिका क्षेत्रामध्ये 2007 वर्षापासून अपंग व्यक्ती व मुले यांच्याकरीता शिक्षण, प्रशिक्षण व सेवा सुविधा पुरविण्याचे अविरत कार्य करीत आहे. ‘इटीसी’ केंद्राने आपल्या कार्याची व्याप्ती व विविधतेचा आलेख नेहमीच उंचावत ठेवला आहे.
सन 2011 मध्ये उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरीकरीता पंतप्रधान पुरस्कार, सन 2012 मध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचा अपंग कल्याण महाराष्ट्र राज्य पुरस्कार तसेच सन 2012 मध्ये QCI National Acreditation Board Of Education & Camp; Traning यांच्याकडून उत्कृष्ट व गुणवत्तापुर्वक कार्यप्रणाली म्हणून प्रमाणित करण्यात येणे ही ‘इटीसी’ केंद्राच्या उत्कृष्ट कामगिरीची पोचपावती आहे.
‘इटीसी’ केंद्राने आपल्या अभिनव उपक्रमांमध्ये नाविन्य आणत उत्तरोत्तर यशस्वीरित्या प्रगती केली आहे व महापालिका क्षेत्रातील अपंग व्यक्ती व मुले यांच्या पुर्नवसन व सबलीकरणाला पुढाकार दिला आहे. ‘इटीसी’ केंद्राचे हे कार्य जगभरातून आलेल्या सर्व अतिथींनी, तज्ज्ञांनी व संस्थांनी नावाजले आहे व आपले उत्कृष्ट अभिप्राय नोंदवले आहेत.
क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया आणि इटीसी केंद्र यांचे नाते 2010 पासून नेहमीच सकारात्मक राहिले आहे. 2012 मध्ये QCI NABET कडून प्रमाणित झाल्यानंतर ‘इटीसी’ केंद्राने उत्तरोत्तर नवीन आव्हाने व उपक्रम हे आदर्श नियोजन, उपलब्ध मनुष्यबळ व संसाधनांचा सुयोग्य व परीपूर्ण वापर या बळावर पार पाडले आहेत.
‘इटीसी’ केंद्राच्या या प्रगतीचा आलेख समोर ठेवून यावर्षीच्या क्यू.सी.आय – डी.एल.शाह पुरस्कार 2016 करीता महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली, केंद्राच्या संचालक डॉ. वर्षा भगत यांनी निवेदन केले व क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया, दिल्ली येथे केंद्राचे यशस्वी सादरीकरण केले.
सदर प्रक्रियेअंतर्गत QCI NABET च्या अधिका-यांनी 6 ऑगस्ट 2016 रोजी केंद्राला भेट झाली. यामध्ये कौन्सिलचे प्रमुख सल्लागार डाॅ. अनिल श्रीवास्तव यांनी केंद्राची पाहणी केली. विशेष मुले, त्यांचे पालक व कर्मचारी यांच्याशी संवाद साधत त्यांनी आपल्या काव्यात्मक शैलीमध्ये ‘इटीसी’ केंद्राच्या लोककल्याणकारी कामास गौरविले, ‘etc’ केंद्रातील आदर्श कार्यप्रणालीची प्रशंसा केली व संचालक तथा कर्मचारी यांचे समर्पित कामाबद्दल कौतुक करीत सर्वांना क्यू.सी.आय.- डी.एल.शाह पुरस्कार 2016 करीता शुभेच्छा दिल्या.